(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तुमचे 12 वाजायला 10 मिनिटं शिल्लक दाखवतंय; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा अजितदादांवर 'टायमिंग शॉट'
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा आणि घड्याळ हे चिन्ह देण्यात आलं आहे
मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून राजकीय पक्ष एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत. त्यातच, लोकसभा निवडणुकांपूर्वी फुट पडलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) नेतेच एकमेकांविरुद्ध अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते अजित पवार गुलाबी रंगांच्या जॅकेटमुळे आणि डीपीडीसी बैठकीमुळे राजकीय वर्तुळात केंद्रस्थानी आहेत. पुण्यातील बैठकीत अजित पवार (Ajit Pawar) आणि सुप्रिया सुळे यांच्यात थेट शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर, आमदार रोहित पवार, खासदार अमोल कोल्हे यांनीही अजित पवारांवर निशाणा साधला. अजित पवारांनी आज पिंपरीतील मेळाव्यातून यास प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, पिंपरीतील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी अजित पवारांना घड्याळ भेट दिलं, त्यावरुन शरद पवारांच्या (Sharad pawar) राष्ट्रवादीने अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा आणि घड्याळ हे चिन्ह देण्यात आलं आहे. त्यामुळे, गत लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाची नव्याने स्थापना झाली. त्यानंतर, लोकसभा निवडणुकांसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्हही देण्यात आलं होतं. मात्र, पक्ष गेलं, चिन्ह गेलं तरीही नव्याने स्थापन केलेल्या पक्षासोबत शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत आपला करिश्मा दाखवून दिला. लोकसभेच्या 10 पैकी 8 जागा जिंकत पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पाठीशी महाराष्ट्रातील जनता असल्याचं त्यांनी दाखवून दिलं. मात्र, आता विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने दोन्ही राष्ट्रवादीतील नेते प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करत आहेत.
कधी जाहीर सभांमधून, कधी बैठकांमधून, कधी पत्रकार परिषदांमधून तर कधी सोशल मीडियातून दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने येत आहेत. अजित पवारांच्या पिंपरी येथील मेळाव्यात काही कार्यकर्त्यांनी अजित पवारांना घड्याळ भेट दिलं. त्यावेळी, कार्यकर्त्यांनी भेट दिलेल्या घड्याळात 12 वाजण्यासाठी केवळ 10 मिनिटांचा अवधी असल्याचं छायाचित्रा दिसून येत आहे. त्यावरुन, आता शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवारांवर निशाणा साधला आहे. स्वतः कमावलेल्या आणि हिसकावून घेतलेल्या गोष्टीत फार फरक असतो. त्यामुळेच तुम्ही हिसकावून घेतलेलं चिन्हं सुद्धा तुमचे 12 वाजायला 10 मिनिटं शिल्लक आहे हेच दाखवतंय, असे ट्विट एनसीपीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन करण्यात आलंय. त्यामुळे, या फोटोवरुनही अजित पवारांना लक्ष्य करण्याची संधी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाते नेते आणि पदाधिकारी साधत असल्याचं दिसून येतं.
स्वतः कमावलेल्या आणि हिसकावून घेतलेल्या गोष्टीत फार फरक असतो.
— Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@NCPspeaks) July 21, 2024
त्यामुळेच तुम्ही हिसकावून घेतलेलं चिन्हं सुद्धा तुमचे १२ वाजायला १० मिनिटं शिल्लक आहे दाखवतय. pic.twitter.com/nvPbeafcbL
आयोगाने अजित पवारांना दिलं पक्ष आणि चिन्ह
दरम्यान, निवडणूक आयोगाने अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह दिलं आहे. अजित पवारांसोबत असलेल्या आमदारांच्या संख्याबळाच्या आणि इतर कायदेशीर बाबींचा उल्लेख करत हे पक्ष व चिन्ह अजित पवारांना देण्यात आलं. त्यामुळे, शरद पवार यांनी नवीन पक्षाची स्थापना केली असून त्याचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हे आहे.
हेही वाचा
मोठी बातमी! विधानसभा एकत्र, पण महापालिका स्वतंत्र लढणार; अजित पवारांची पुण्यातून घोषणा