Gautam Adani house meeting: भाजप अन् शरद पवारांच्या चर्चांमधला कॉमन फॅक्टर, गुप्त राजकीय चर्चा 'या' एकाच माणसाच्या घरी का होतात?
Maharashtra Politics: उद्योजक गौतम अदानी हे महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घटकांना एकत्र आणणाऱ्या मध्यस्थाची भूमिका सातत्याने बजावत आहेत. त्यांचे दिल्लीतील घर गुप्त राजकीय भेटींचे केंद्रस्थान ठरत आहे.
मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आगामी काळातील खडतर वाटचालीचे संकेत आणि पुढील 5 वर्षे कोणतेही 'भवितव्य' दिसत नसल्याने शरद पवार गटातील काही खासदार आणि आमदारांनी भाजपसोबत सत्तेत जाण्याची भाषा सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. त्यादृष्टीने शरद पवार गट आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा पडद्यामागे वाटाघाटींना सुरुवात झाली आहे. या गुप्त वाटाघाटींमध्ये पुन्हा एकदा देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. भाजप आणि शरद पवार यांच्यातील प्रत्येक चर्चेत गौतम अदानी यांचे घर जणू कॉमन फॅक्टर झाला आहे. त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा बदलू शकणाऱ्या या गुप्त राजकीय गाठीभेटी या गौतम अदानी यांच्याच घरी का होतात? भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना गुप्त राजकीय चर्चांसाठी अदानी यांच्या घराच्या चार भिंती इतक्या सुरक्षित का वाटतात?, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत भाष्य केले. अलीकडच्या काळात गौतम अदानी यांच्या घरी राजकीय बैठका होतात. ते महाराष्ट्राचे भवितव्य ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यांनी मुंबईचं विमानतळ ताब्यात घेतलं, ज्यांनी धारावीसह मुंबईची हजारो एकर जमीन गिळली, ज्यांनी महाराष्ट्रातील जकात नाके ताब्यात घेतले, ते गौतम अदानी महाराष्ट्राचे राजकीय आणि सामाजिक भवितव्य ठरवणार आहेत. गौतम अदानी म्हणजे आचार्य विनोबा भावे आहेत का, ते म्हणजे दादा धर्माधिकारी आहेत का, अदानी म्हणजे जमनालाल बजाज आहेत का किंवा यशवंतराव चव्हाण आहेत का? जे गटातटाच्या राजकारणात मध्यस्थी करुन महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम करत आहेत. गौतम अदानी हे पंतप्रधान मोदींचे मित्र आहेत. मित्र म्हणून हा महाराष्ट्रा आणि देश लुटण्याचा प्रयत्न करणार. त्यासाठी महाराष्ट्रात राजकारण करणार, भवितव्य ठरवणार. जे मुंड्या खाली घालून त्यांच्या घरी बसत आहेत, त्यांना स्वत:ला मराठी म्हणवून घ्यायला लाज वाटली पाहिजे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
संजय राऊत यांच्या टीकेमुळे गौतम अदानी आणि त्यांच्या राजकीय लागेबांध्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी अजित पवार यांनीही 2019 मध्ये अदानी याच्या घरी बैठक झाल्याचे म्हटले होते. या बैठकीतही शरद पवार आणि भाजपमध्ये युती करण्याविषयी चर्चा झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा दिल्लीतील गौतम अदानी यांच्या घरी शरद पवार गटाचा बडा नेता आणि भाजपच्या केंद्रीय नेत्याची भेट झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. यानिमित्ताने गौतम अदानी यांना महाराष्ट्राच्या राजकारणात इतका रस का आहे, हा प्रश्न पु्न्हा एकदा उपस्थित झाला आहे.
आणखी वाचा