Cidco : सिडकोला नवीन अध्यक्ष मिळणार, मंत्री संजय शिरसाट यांचा कार्यभार संपुष्टात,आमदारांचं लॉबिंग सुरु
Sanjay Shirsat Cidco : शहर व औद्योगिक विकास महामंडळ अर्थात सिडकोच्या अध्यक्षपदाचा संजय शिरसाट यांच्याकडील कार्यभार संपुष्टात आणण्यात आला आहे.
नवी मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना अखेर सिडकोच्या (Cidco) अध्यक्ष पदावरून पदमुक्त करण्यात आले आहे. शहर व औद्योगिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. त्यामुळं आता सिडकोचं अध्यक्षपद कुणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. संजय शिरसाट यांचा कार्यभार संपुष्टात आणल्याचा शासन निर्णय नगरविकास विभागाकडून जारी करण्यात आलं आहे. सिडकोचं अध्यक्षपद एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे राहणार की मित्रपक्षांकडे जाणार हे पाहावं लागेल. याशिवाय नवी मुंबईतील आमदारांनी देखील सिडकोच्या अध्यक्षपदासाठी लॉबिंग सुरु केल्याची माहिती आहे.
नगरविकास विभागाकडून शासन निर्णय जारी
शहर व ओद्योगिक विकास महामंडळाकडून नवी मुंबई, नाशिकसह इतर शहरांमध्ये सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्यात येते. संजय शिरसाट यांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळालं नव्हतं. मात्र, महायुतीच्या सरकारचा कार्यकाळ संपण्यापूर्वी संजय शिरसाट यांना सिडकोचं अध्यक्षपद देण्यात आलं होतं. त्याचप्रमाणं भरत गोगावले यांना देखील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचं अध्यक्ष करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये संजय शिरसाट कॅबिनेट मंत्री झाले आहेत. त्यामुळं त्यांच्याकडील सिडकोचा कार्यभार संपुष्टात आणण्यात आणला आहे.
कॅबिनेट मंत्री असूनही पदावर काय?
संजय शिरसाट यांना देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान मिळालं आहे. नागपूरमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यात ते मंत्री बनले होते.कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानंतरही शिरसाट हे सिडकोच्या अध्यक्षपदावर कायम होते.मागील महायुती सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराजी दूर करण्यासाठी शिरसाट यांना सिडकोचं अध्यक्षपदी नियुक्ती केली होती.
शासन निर्णयाद्वारे कार्यकाळ संपुष्टात
संजय शिरसाट यांनी मंत्रिपदी निवड झाल्यानंतर सिडकोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणे अपेक्षित होते. गुरूवारी शासन निर्णय जारी करत संजय शिरसाट यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर नियमानुसार सिडकोच्या अध्यक्षपदाचा कार्यभार संपुष्ठात आला असल्याची माहिती देण्यात आली.
सिडकोच्या अध्यक्षपदासाठी लॉबिंग सुरु
नगरविकास विभागानं काल शासन निर्णय जारी करत संजय शिरसाट यांचा कार्यभार संपुष्टात आणला आहे. आता लवकर सिडकोच्या नव्या अध्यक्षाची निवड केली जाईल. मात्र, सिडकोच्या अध्यक्षपदासाठीही आता मोठ्या प्रमाणात लाॅबिंग सुरु झालं आहे. यामध्ये नवी मुंबईतील आमदार आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, भरत गोगावले हे देखील कॅबिनेट मंत्री झाले आहेत. एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा दिलाय की नाही यासंदर्भातील काही माहिती समोर आलेली नाही.
इतर बातम्या :