Sion Land VHP: राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय, सायनमधील सोन्याचा भाव असणारा भूखंड विश्व हिंदू परिषदेला दिला
Mumbai Dharavi land parcel allotted to VHP: धारावीतील एक मोक्याचा भूखंड विश्व हिंदू परिषदेला 30 वर्षांच्या भाडेतत्वावर देण्यात आला आहे. सरकारच्या निर्णयावरुन वादंग निर्माण होण्याची शक्यता.

Mumbai Dharavi land parcel allotted to VHP: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाने सायन (Sion news) येथील सुमारे दोन एकर मोकळा बीएमसीचा भूखंड 30 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर विश्व हिंदू परिषदेला (VHP) देण्यास मंजुरी दिली आहे. या संदर्भातला शासन आदेश 4 डिसेंबर रोजी जारी करण्यात आला आहे. एफ/उत्तर विभागातील भूकर क्र. १२ (भाग) सायन येथील, येथील ७६५८.३३ चौ.मी. क्षेत्रफळाच्या रिक्त भूभाग भाडेपट्टा तत्त्वावरील भूभागाचे मक्ता भूभागात रुपांतरण करुन विश्व हिंदू परिषदेस ३० वर्ष कालावधीकरिता मक्त्याने आला आहे. या भूखंडासाठी बीएमसीकडून (BMC) एकरकमी 9.7 कोटी रुपयांचा प्रीमियम आणि दरवर्षी 10,186 रुपयांचे सवलतीच्या दराने भाडे आकारले जाईल. या भूखंडाचा वापर वैद्यकीय आणि शैक्षणिक कामांसाठी करण्यात येणार आहे, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आला आहे. या जमिनीची बाजारभावानुसार सध्याची किंमत तब्बल 247 कोटी रुपयांच्या घरात आहे. मात्र, हा भूखंड विहिंपला वर्षाला फक्त 10 हजार रुपये इतके नाममात्र भाडे घेऊन देण्यात आल्याने वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. (Mumbai news)
मुंबई काँग्रेसकडून राज्य सरकारच्या या निर्णयावर टीका करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजपशी जवळीक असलेल्या संघटनेला शहरातील मोक्याची जागा दिली जात आहे. एकीकडे मुंबई महानगरपालिका दिवाळखोरीच्या दिशेने जात असल्यामुळे भुखंडांचा लिलाव करत आहे. तर दुसरीकडे महायुती सरकार मुंबईतील मोक्याच्या जागा त्यांच्या विचारसरणीच्या संघटनांना देत आहे. अशाप्रकारे एखाद्या संघटनेला भूखंड देण्याची ही पहिली वेळ नाही. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात राज्य सरकारने वडाळा येथील कोट्यवधी रुपयांचा भूखंड वीर सावरकर चॅरिटेबल ट्रस्टला शैक्षणिक कारणांसाठी देऊ केला होता, असे मुंबई काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी म्हटले.
यासंदर्भात विश्व हिंदू परिषदेच्या शंभू पांडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ही जागा आम्हाला 1984 ला मिळाली तेव्हा इथे काही नव्हते. 2013 पासून आम्ही या जागेचा विकास करण्यास सुरुवात केली. या ठिकाणी सध्या 270 लोक राहत आहेत. त्यात कॅन्सर रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक आहेत. त्यांचा नाश्ता जेवण हे संस्थेकडून दिले जाते. 500 बेड असलेल्या या ठिकाणी आम्हाला आणखी काही वैद्यकीय सुविधा सुरू करायच्या आहेत. याठिकाणी आजुबाजूच्या झोपडपट्टीमधील लोकांसाठी संगणक वर्ग, शिलाई मशीन क्लास ही चालवला जातो. तसेच या परिसरात मंदिराचे काम सुरू आहे. हे काम एखाद्या पक्षाचे नसून संस्थेचे आहे. त्यामुळे इथे सर्व लोक आणि सर्वपक्षीय लोक येतात, असे प्रकल्प व्यवस्थापक शंभू पांडे यांनी सांगितले.
आणखी वाचा






















