Sanjay Raut : अमित शाह यांचा गृहमंत्रिपदाचा राजीनामा घ्या, संजय राऊत यांची नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी
Sanjay Raut : संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत अमित शाह हे अपयशी गृहमंत्री असल्याचं म्हटलं. नरेंद्र मोदी यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दररोज जवान शहीद होत आहेत, असं म्हटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचं सरकार याला जबाबदार आहे, असं संजय राऊत म्हणाले. अमित शाह पूर्ण ताकद आमच्यासोबत लढण्यासाठी ताकद लावत आहेत. यामुळं दहशतवादी सुटलेत, जम्मू काश्मीर असो की मणिपूर असो अमित शाह जबाबदार आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला. अमित शाह यांनी राजीनामा द्यायला हवा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा घ्यावा, असं संजय राऊत म्हणाले. थोडी जरी नैतिकता असेल तर अमित शाह यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी संजय राऊत यांनी केलीय. जम्मू काश्मीरमध्ये दोडा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये एका कॅप्टनसह चार जवान शहीद झाले होते. यामुद्यावरुन संजय राऊत यांनी केंद्र सरकावर हल्ला चढवला.
अमित शाह पूर्णपणे अयशस्वी गृहमंत्री आहेत. देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष नाही. देशाच्या सुरक्षेकडे लक्ष नाही फक्त निवडणूक लढा, निवडणूक जिंका, इथं तिथं दबाव आणा , आपल्या विरोधकांना संपवा असा प्रकार सुरु आहे. देशाच्या विरोधकांना संपवा, असं आव्हान संजय राऊत यांनी दिलं. तुमच्यात हिम्मत असेल तर आपले जवान दररोज शहीद आहेत. तुम्ही कीर्तीचक्र द्याल, पण यानं काही होत नाही. आम्ही त्या जवानांच्या बलिदानाला शहादत म्हणू पण दररोज जवान शहीद होत आहेत, असं संजय राऊत म्हणाले. जवानांच्या हत्येला मोदी शाहांचं सरकार जबाबदार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं.
सर्व भ्रष्ट लोक फक्त अजित पवार नाही,एकनाथ शिंदे, भावना गवळी, प्रताप सरनाईक, रवींद्र वायकार असो, काही लोक जिंकवले गेले. अपघातानं पैशाच्या ताकदीनं जिंकले, असं संजय राऊत म्हणाले. मात्र, सर्व भ्रष्टाचारी लोक आपल्यासोबत घेतल्यानं आरएसएस आणि भाजप पूर्णपणे भ्रष्ट आणि बदनाम झाले, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
अमित शाह अपयशी गृहमंत्री : संजय राऊत
नरेंद्र मोदी यांनी ज्या दिवशी पंतप्रधानपदाची शपथ घेतली त्यावेळी काश्मीरमध्ये सगळ्यात मोठा हल्ला झाला. तिच विटी आणि तोच दांडू, तेच गृहमंत्री जे पाच वर्ष अपयशी ठरले. तेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, ज्यांच्याकडून काहीच ठोस कार्य झालं नाही. तेच अमित शाह, तेच राजनाथ सिंग, अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमध्ये धुमाकूळ घातलेला आहे. अमित शाह देशाचे गृहमंत्री म्हणून हात चोळत बसलेले आहेत किंवा फक्त राजकारणात व्यस्त आहेत. अमित शाह देशाच्या निवडणुका, इतर उद्योग, रोखे जमवणं, धमक्या देणं याच्यात व्यस्त आहेत. देशाचे दुश्मन मात्र व्यस्त आहेत. अमित शाह आपल्या राजकीय विरोधकांना दुश्मन समजतात. अमित शाह यांनी आमच्या जवानांच्या हत्या करणाऱ्यांना देशाचं दुश्मन समजलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.
अमित शाह यांनी जेवढी ताकद आपल्या राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी लावली ती ताकद जम्मू काश्मीर, मणिपूरमध्ये देशाच्या शत्रूंना खतम करण्यासाठी लावली असती तर जवानांच्या हत्या पाहण्याची वेळ आमच्यावर आली नसती, असं संजय राऊत म्हणाले. नरेंद्र मोदींनी शपथ घेतल्यापासून 40 जवानांच्या हत्या झाल्या आहेत. हत्या म्हणतोय मी, बलिदान, हौतात्म्य मान्य आहे पण या हत्यांना देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. नरेंद्र मोदी यांनी अमित शाह यांचा राजीनामा घ्यावा. अमित शाह हे अपयशी गृहमंत्री आहेत, त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी संजय राऊत यांनी केला.
संबंधित बातम्या :
Sanjay Raut: शिखर बँक घोटाळ्यात क्लीनचीट मिळणं हाच एक घोटाळा, संजय राऊतांची टीका