Sharad Pawar : सुप्रिया सुळेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष करा, राष्ट्रवादी विलीन करतो; शरद पवारांनी आधीच प्रस्ताव ठेवल्याचा काँग्रेस माजी खासदाराचा दावा
NCP : लोकसभा निवडणुकीनंतर काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात असा दावा राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी केला. त्यानंतर आता राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.
मुंबई: अनेक प्रादेशिक पक्ष येत्या काळात काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात असं भाकीत शरद पवारांनी (Sharad Pawar) केलं आणि त्यानंतर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या. काँग्रेसचे माजी खासदार आणि सध्या शिंदे गटात असलेल्या संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव या आधीच आला होता, पण सुप्रिया सुळेंना महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षा करा अशी अट शरद पवारांनी ठेवली होती असा वादा निरुपम यांनी केला. काँग्रेसने हा प्रस्ताव फेटाळला होता असंही त्यांनी सांगितलं.
संजय निरुपम म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रयत्न मागील काही वर्षांपासून सुरू आहे. काँग्रेसकडून पण या संदर्भात प्रस्ताव होता आणि शरद पवार साहेबांकडूनसुद्धा या संदर्भातील प्रस्ताव होता. या प्रस्तावामध्ये एक अट होती. शरद पवारांनी ही अट टाकली होती की जर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन केलं तर सुप्रिया सुळे या महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्ष असतील. त्यावर काँग्रेस पक्षाने आक्षेप घेतला आणि हा प्रस्ताव काँग्रेसकडून नाकारण्यात आला.
काय म्हणाले संजय निरुपम?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटण्यापूर्वी हा प्रस्ताव होता, दिग्विजय सिंग यांनी तर ओपनली प्रस्ताव ठेवला होता असं संजय निरुपम म्हणाले. ते म्हणाले की, बाकी पक्ष विलीन होणार नाहीत, फक्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची विलीन होण्याची तयारी दिसत आहे. याचं कारण म्हणजे बारामती त्यांच्याकडून जात आहे. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या पक्षाच्या आता कार्याध्यक्षा आहेत. मात्र त्यांच्याकडे एवढी राजकीय समज नाही की त्या पक्षाला त्या पुनर्जीवीत करू शकतात.
उद्धव ठाकरे कधीही भाजपसोबत जाऊ शकत नाहीत, पण राजकारणात काही होऊ शकतं असं संजय निरूपम म्हणाले.
शरद पवार यांची पार्टी म्हणजे लॉस मेकिंग युनिट असून काँग्रेस पूर्वीपासून लॉस मेकिंग युनिट राहिलं आहे. यांचं मर्जर झालं तर थर्ड लॉस मेकिंग युनिट तयार होईल असा टोलाही संजय निरुपम यांनी लगावला.
संजय निरुपम म्हणाले की, काँग्रेस पक्षाची ताकद आता कोणी वाढवू शकत नाहीत, त्यांचा विचार गेला आहे. सध्याची स्थिती बघता महाराष्ट्र काँग्रेस ही शिवसेना ठाकरे गटामध्ये विलीन होऊ शकते. याप्रकारे जागा वाटपामध्ये शिवसेना ठाकरे गटांने महाराष्ट्र काँग्रेसला डॉमिनेट केलं ते पाहता असं होऊ शकतं. कारण काँग्रेसचा हाय कमांड पूर्णपणे ठाकरेंसमोर सरेंडर दिसलं. पुढचे निर्णय होतील ते निकालानंतर, कोणाची ताकद घटली कोणाची ताकद वाढली हे स्पष्ट होईल आणि राजकारणात घडामोडी घडतील.
प्रादेशिक पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत येतील, पवारांचा दावा
इंडिनय एक्सप्रेसला मुलाखत देताना शरद पवारांनी एक दावा केला. शरद पवारांनी 4 मे रोजी इंडियन एक्स्प्रेसला एक मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी म्हटलंय की लोकसभा निवडणुकीनंतर काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात. तुमचा पक्षही विलीन होईल का असं विचारल्यावर त्यांनी कोणतंही थेट उत्तर न देता काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकाच विचारधारेचे पक्ष असल्याचं सांगितलं. मात्र याबाबतीत कुठलाही निर्णय सहकाऱ्यांच्या संमतीनेच होईल, आम्ही घाईने कुठलाही निर्णय घेणार नाही असंही पवार त्या मुलाखतीत म्हणाले. तर एबीपी माझाशी बोलताना शरद पवार म्हणतात की, आगामी काळात छोटे पक्ष आमच्यासोबत येताना पाहायला मिळतील. आमची ताकद वाढत आहे.
ही बातमी वाचा: