मविआचं ठरलं! सांगलीची जागा ठाकरे गटच लढवणार, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील उमेदवार
Sangli Lok Sabha Election 2024 : सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस दोन्हीही आग्रही पाहायला मिळाले. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत अखेर हा निर्णय घेण्यात आला आहे.
Maharashtra Politics : महाविकास आघाडीचा सांगली लोकसभा जागेचा तिढा सुटला आहे. सांगलीची जागा शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटच (Thackeray Group) लढवणार हे आता ठरलं आहे. शनिवारी रात्री महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. बैठकीत वरिष्ठ नेत्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सांगलीची जागा ठाकरे गटाकडे जाणार आहे. सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस दोन्हीही आग्रही पाहायला मिळाले. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत अखेर हा निर्णय घेण्यात आला आहे.
सांगलीच्या जागेचा तिढा सुटला
सांगली लोकसभेच्या जागेवर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात रस्सीखेच सुरु असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आता ही अडचण दूर झाली आहे. मविआच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत ही जागा ठाकरे गटासाठी सोडण्यावर एकमत झालं आहे. सांगली लोकसभेसाठी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असणार आहे. काही दिवसांपूर्वींच चंद्रहार पाटील यांनी शक्तीप्रदर्शन करत मातोश्रीवर जाऊन पक्षप्रवेश केला होता.
चंद्रहार पाटील ठाकरे गटाचे उमेदवार
चंद्रहार पाटीलच शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असणार यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे. स्वतः शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी सांगलीत सभा घेणार आहेत. 21 मार्चला सांगली आणि मिरजमध्ये चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे जनसंवाद मेळावा घेणार आहेत.
रामटेकच्या जागेचं काय?
महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगली (Sangli) आणि रामेटक (Ramtek) या दोन जागावरील तिढा सुरु होता. या दोन्ही जागांसाठी ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात रस्सीखेच असल्याचं पाहायला मिळत होतं. पण आता सांगलीच्या जागेचा तिढा सुटला आहे. आता रामटेकच्या जागेचं काय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महायुतीतही रामटेक मतदारसंघावरुन पेच कायम
महायुतीमध्येही रामटेक मतदारसंघाचा पेच कायम कायम आहे. महायुतीतही रामटके मतदारसंघावरून रस्सीखेच सुरु असताना शिवसेना शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी प्रचार सुरु केला आहे. दरम्यान, या जागेवर भाजपने देखील दावा केला आहे. ही जागा लढवण्यासाठी भाजप इच्छुक आहे.