Aditya Thackeray: पहिल्याच अधिवेशनात महाविकास आघाडीमध्ये जुंपली; आदित्य ठाकरेंना रईस शेख यांनी सुनावलं!
Aditya Thackeray: अबू आझमी भाजपच्या बी टीमसारखे वागतात असं आदित्य ठाकरे म्हणाले.
Aditya Thackeray मुंबई: विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गट आणि समाजवादी पक्ष यांच्यात जुंपल्याची पाहायला मिळत आहे. विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथविधीवर बहिष्कार टाकला होता. मात्र यावेळी समाजवादी पक्षाने वेगळी भूमिका घेत अबू आझमी (Abu Azmi) आणि रईस शेख यांनी शपथ घेतली. तसेच कोण विरोधक? त्यांनी आमच्याशी निवडणुकीच्या दरम्यान संपर्क साधला नाही. तिकिट वाटपात आमच्याशी बोलणी केली नाही. मग आम्हाला त्यांच्याशी घेणं देणं काय?, असं विधानही केलं. त्यामुळे समाजवादी पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर असल्याचे देखील स्पष्ट संकेत दिसत आहे.
समाजवादी पक्षाच्या या भूमिकेवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला. अबू आझमी भाजपच्या बी टीमसारखे वागतात असं आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरेंच्या या विधानावर समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जेव्हा ठाकरेंच्या उमेदवारांसाठी समाजवादी पक्षानं प्रचार केला, तेव्हा आदित्य ठाकरेंना समाजवादी पक्ष भाजपची बी टीम असल्याचं दिसलं नाही का?, असा सवाल रईस शेख यांनी आदित्य ठाकरेंना विचारला.
रईस शेख काय म्हणाले?
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जेव्हा ठाकरेंच्या उमेदवारांचा प्रचार समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला तेव्हा आदित्य ठाकरे यांना समाजवादी पक्ष हा भाजपची बी टीम दिसली नाही का?, ठाकरेंच्या शिवसेनेच्या कट्टर हिंदुत्वात मुद्द्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सुद्धा चर्चा करावी आणि योग्य तो निर्णय घ्यावा, असं रईस शेख यांनी सांगितले. बाबरी मशिद समर्थनार्थ ठाकरेंची शिवसेना बोलत असेल तर त्यावर आम्ही बोलणार, याआधी सुद्धा आम्ही याबाबत बोललेलो होतो. महाविकास आघाडीच्या मुद्द्यांवर बनली आहे. त्यावर बोलावं, असं आवाहन देखील रईस शेख यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना केलं आहे.
...अशा पक्षाबरोबर समाजवादी पार्टी राहू शकत नाही- अबू आझमी
अबू आझमी यांनी शिवसेना ठाकरे गटावर देखील निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर काम करा, असे कार्यकर्त्यांना सांगितले जाते. 6 डिसेंबरला बाबरी मशीद पाडणाऱ्यांचे अभिनंदन केले जाते. अशा पक्षाबरोबर समाजवादी पार्टी राहू शकत नाही. त्यामुळे मी महाविकास आघाडीसोबत राहीन, असे वाटत नाही, असं अबू आझमी म्हणाले. तसेच समाजवादी पक्ष सेक्युलर आहे, आम्ही कम्युनल भाषा करणाऱ्या पक्षासोबत कसे राहणार? असा प्रश्न अबू आझमींनी विचारला आहे. महाविकास आघाडी सगळ्या आमदारांनी आज शपथ घेण्यास नकार देत विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला होता. मात्र, अबू आझमी यांनी महाविकास आघाडीच्या भूमिकेशी फारकत घेत आमदारकीची शपथ घेतली. तर भिवंडीचे आमदार रईस शेख यांनीही आमदारकीची शपथ घेतली. त्यामुळे अबू आझमी महाविकास आघाडीची साथ सोडतील अशा चर्चा आहेत.