(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत 100 टक्के भाकरी फिरवण्याची वेळ, माझ्यावर राज्य पातळीवर जबाबदारी दिली तर स्वीकारणार, रोहित पवारांचा निर्धार
Rohit Pawar on NCP Sharad Pawar, पुणे :
Rohit Pawar on NCP Sharad Pawar, पुणे : "शरद पवार गटात भाकरी फिरवण्याची शंभर टक्के वेळ आली आहे. माझ्यावर राज्य पातळीवरील जी जबाबदारी देतील ती मी स्वीकारणार", असा निर्धार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलाय. ते पुण्यात एबीपी माझाशी बोलत होते. ईव्हिएम संदर्भात काही लोकांनी अजून काही माहिती दिली आहे, असंही रोहित पवारांनी यावेळी सांगितलं.
रोहित पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद मिळणार का माहिती नाही, मात्र पंकजा मुंडे यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे, त्या लोकनेत्या आहेत. भाजपचा 88 टक्के शिंदे गटाचा 70 टक्के अजितदादा 69 टक्के स्ट्राईक रेट आहे. 10 टक्के मतं भाजपला ईव्हिएमवर मिळत होती, ती सेट करण्यात आली होती. ईव्हिएममध्ये जर सेट केलं नसतं तर महाविकास आघाडीचे 126 आमदार निवडून आले असते. उत्तम जानकर यांच्या गावात बॅलेट पेपरवर मतदान घेणार आहेत. मोहोळमध्ये काही लोकं लॅपटॉप घेऊन मतदान केंद्रावर फिरत होते असं सांगितलं जात आहे. ईव्हीएम मशीन आम्हाला द्यावीत आम्ही त्यावर चौकशी करू ,असं आव्हानही रोहित पवारांनी दिलं.
एकनाथ शिंदे यांना धोक्याची जाणीव झाली आहे, त्यामुळे ते गृहमंत्री पद मागत आहेत. अजित पवार यांच्या पक्षातील कोण मंत्री होणार हे त्यांनी ठरवले पाहिजे. मात्र भाजपच ते ठरवताना दिसते आहे. भाजपला फॅार असणार्या शिंदे आणि अजित पवार गटातील आमदारांना मंत्रिपद मिळेल. पंकजा मुंडे यांना भाजप मुख्यमंत्री करु शकेल. त्यांचा अनुभव आहे. त्या ओबीसी नेत्या आहेत. त्यामुळे त्यांना देखील संधी मिळू शकेल, असंही रोहित पवार म्हणाले.
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, पाथर्डीत आमचे उमेदवार निवडून येणार असं वाटतं होते. या ज्या शंका आहेत, त्या पालिका निवडणूका होण्याआधी दूर झाल्या पाहिजेत. कोर्टाच्या भरतीत कंत्राटी भरती करणार असं समजतंय त्याला आमचा विरोध असणार आहे. लाडकी बहीण योजनेत काही अटी शर्थी टाकल्या जाणार, 2100 रुपये दिले जाणार का? यावर शंका आहे. आम्ही अधिवेशनाची वाट बघत आहोत. कालच्या बैठकीत मीच रोहित पाटलांचे नाव सुचवलं आहे,मला विरोधी पक्षात जी जबाबदारी मिळेल ती स्वीकरणार आहे. हे सरकार सर्वांना लाभ देईल असं वाटत नाही,. बऱ्याच महिला यामध्ये बाद होतील, काही योजना अशा आहेत निवडणुकींच्या आधी घोषणा केल्यात मात्र नंतर त्या बंद झाल्यात. आता लाडकी बहीण योजनेचे काय होतं ते बघूया.
इतर महत्त्वाच्या बातम्या