(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rajasthan Politics : अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यात समेट, खरगेंच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर दोघांमधील वादावर पडदा
Rajasthan Politics : राजस्थानमधील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी, काँग्रेसने मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यात सुरु असलेला वाद रोखण्याचा प्रयत्न केला.
Rajasthan Politics : कर्नाटक विधानसभेचा रणसंग्राम जिंकल्यानंतर काँग्रेसचं संपूर्ण लक्ष आता राजस्थानकडे (Rajasthan) आहे. राजस्थानमधील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी, काँग्रेसने मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यात सुरु असलेला वाद रोखण्याचा प्रयत्न केला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सरचिटणीस केसी वेणुगोपाल, राजस्थान काँग्रेस प्रभारी सुखविंदर सिंह रंधावा, राहुल गांधी, मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यात सोमवारी (29 मे) सुमारे चार तास बैठक झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी रात्री उशिरा ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर सर्व नेते बाहेर आले, मात्र फक्त केसी वेणुगोपाल यांनीच माध्यमांना संबोधित केलं. पत्रकारांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट या दोघांनाही प्रश्न विचारले, परंतु दोघांनीही कोणतंही भाष्य करण्यास टाळलं, त्यांनी केवळ स्मितहास्य करत प्रसारमाध्यमांचा निरोप घेतला.
या बैठकीनंतर काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन ट्वीट करण्यात आलं, ज्यात "अशोक गहलोत आणि सचिन पायलट एकत्र निवडणूक लढवणार. आम्ही राजस्थान जिंकणार," असं केसी वेणुगोपाल म्हणाल्याचं सांगण्यात आलं आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद निवळल्याचा अर्थ या ट्वीटमधून काढला जात आहे.
अशोक गहलोत जी और सचिन पायलट जी मिलकर चुनाव लड़ेंगे। हम राजस्थान जीतने जा रहे हैं।
— Congress (@INCIndia) May 29, 2023
: महासचिव (संगठन), श्री @kcvenugopalmp pic.twitter.com/idRDQPEYyZ
गहलोत-पायलट यांच्यात 9 वेळा वादाची परिस्थिती
विशेष बाब म्हणजे राजस्थानमध्ये 2018 मध्ये काँग्रेस सरकार स्थापन झाल्यानंतर पक्षातील दोन प्रमुख नेत्यांमध्ये तब्बल नऊ वेळा वादाची परिस्थिती उद्भवली आणि काँग्रेस हायकमांडने प्रत्येक वेळी त्यांच्यात दिलजमाई केली. काँग्रेसचं नेतृत्त्व दोघांमधील वाद मिटवतं, परंतु काही काळानंतर परिस्थिती पुन्हा बिघडते. मात्र, यावेळी तसं नसल्याचा काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
गहलोत आणि पायलट समर्थकांमध्ये आशा
दुसरीकडे, दिल्लीत झालेल्या या बैठकीनंतर राजस्थानमधील अशोक गहलोत आणि सचिन पायलट या दोघांच्याही समर्थकांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. मात्र, गहलोत आणि पायलट यांच्यात कोणत्या फॉर्म्युल्यानुसार पक्षाने समेट घडवून आणला याबाबत ते अजूनही संभ्रमात आहेत. सोमवारी केसी वेणुगोपाल यांनीही फॉर्म्युलाशी संबंधित प्रश्नांवर उत्तर देण्याचं टाळलं. हा प्रस्ताव काय आहे, असं विचारलं असता वेणुगोपाल म्हणाले की, "दोघांनी तो हायकमांडवर सोडला आहे. एकत्र निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे आणि आम्ही एकत्र लढू आणि भाजपच्या विरोधात विजय मिळवू."
राजस्थानमधील गहलोत आणि पायलट यांच्यातील वाद मिटवण्याचा काँग्रेस नेतृत्त्वाचा प्रयत्न म्हणून या बैठकीकडे पाहिले जात आहे. राजस्थानमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. खरगे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत गहलोत आणि पायलट यांच्यात समेट घडवून आणण्याच्या फॉर्म्युलावर एकमत झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
सचिन पायलट यांची नाराजी
दरम्यान, सचिन पायलट यांनी 2020 मध्ये पहिल्यांदा बंडखोरीची भूमिका घेतली होती. त्यावेळी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होतं. यानंतर पायलट यांना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं होते. यानंतर प्रियंका गांधी वाड्रा आणि राहुल गांधी यांच्या मध्यस्थीनंतर पायलट यांनी मवाळ भूमिका घेतली होती.
त्यानंतर 2022 मध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार होती आणि अशोक गहलोत यांचं नाव शर्यतीत होतं, तेव्हा हायकमांड सचिन पायलट यांची राज्याच्या मुख्यमंत्रिपदी नियुक्ती करु शकतं, असं म्हटलं जात होतं. मात्र, त्यानंतरही तसं काही झालं नाही आणि तेव्हापासून माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आवाज उठवत आहेत.
हेही वाचा
Rajasthan Politics: निवडणुकांच्या तोंडावर कॉंग्रेसचं टेन्शन वाढलं, राजस्थानमध्ये ऑपरेशन पायलट