अरविंद सावंतांचा मतदारसंघ नार्वेकरांनी पिंजून काढला, जागेवरुन अधिकाऱ्याला फोन, बड्या बिल्डरवर कारवाईचा आदेश काढला
South Mumbai lok sabha constituency: राहुल नार्वेकर यांनी दक्षिण मुंबई मतदारसंघातील एका परिसराला रविवारी भेट दिली. यावेळी त्यांनी झोपड्या पाडणाऱ्या बिल्डरवर कठोर कारवाई करण्याचे आदेश सरकारी अधिकाऱ्याला दिले.
मुंबई: विधानसभा अध्यक्ष आणि भाजपचे आमदार राहुल नार्वेकर हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबई मतदारसंघात चांगलेच सक्रिय झाले आहेत. या मतदारसंघातून राहुल नार्वेकर यांना लोकसभेची उमेदवारी मिळू शकते, अशी चर्चा सुरु आहे. परंतु, त्यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. परंतु, गेल्या काही दिवसांमध्ये राहुल नार्वेकरांचा दक्षिण मुंबई मतदारसंघातील वावर प्रचंड वाढला आहे. राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी रविवारी या मतदारसंघातील जिजामाता नगर परिसराला भेट दिली. याठिकाणी एका खासगी बिल्डरकडून काही झोपड्या तोडण्यात आल्या. याबाबत नागरिकांनी तक्रार केल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी थेट विभागातील संबंधित अधिकाऱ्याला फोन लावून बिल्डरविरोधात कारणे दाखवा नोटीस काढण्याचे निर्देश दिले.
राहुल नार्वेकर यांनी फोनवरुन सरकारी अधिकाऱ्याला तातडीने कारवाईच्या सूचना दिल्या. इकडे कोणतीही परवानगी नसताना बिल्डर झोपड्या कशा काय तोडू शकतो? एसआरएने दिलेल्या आदेशाचे पालन केले जात नाही. मला हक्कभंगाची कारवाई करण्याची वेळ येऊन देऊ नका. तुम्ही मला कोणत्याही राजकीय नेत्याचं नाव सांगू नका. तुम्ही बिल्डरला कारणे दाखवा नोटीस काढा. मी तसे निर्देश पाठवतो. एकही झोपडी तुटायला नको. बलवा बिलवा फुलवा माझ्याकडे चालणार नाही, असे सांगत नार्वेकरांनी अधिकाऱ्याला संबंधित बिल्डरवरोधात तातडीने कारवाई करण्याचा आदेश दिला.
नार्वेकरांचा आदित्य ठाकरे, अरविंद सावंतांना टोला
मी वरळीतील झोपडपट्टीच्या परिसरांना भेटी देतोय, तेव्हा लोक म्हणत आहेत की, आमदार आमच्या भागात दिसत नाही. संपूर्ण महाराष्ट्रात बघा कोणत्या मतदारसंघात तीन आमदार आहेत. तरीही या मतदारसंघात कामं होत नाहीत, असे सांगत नार्वेकरांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले. तसेच दक्षिण मुंबईतही येथील खासदार फिरकत नाहीत. खासदाराचा चेहरा येथील लोकांना माहिती नाही. चाळी तशाच पडल्या आहेत, असे राहुल नार्वेकर यांनी म्हटले.
उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर
उद्धव ठाकरे यांनी धारावी येथील सभेत 'अबकी पार भाजप तडीपार', असा नारा दिला होता. भाजप यावेळी 400 लोकसभा जागांचा आकडा कसा गाठतो, ते मी बघतोच, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले होते. त्यांच्या या टीकेला राहुल नार्वेकरांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटले की, इथे उद्धव ठाकरेंचा पक्ष तडीपार होण्याची वेळ आली आहे. त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. ही परिस्थिती का ओढवली, याकडे ठाकरेंनी लक्ष दिलं पाहिजे. त्यांच्याकडून पुन्हापुन्हा त्याच चुका होत आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांवर बोलण्याची गरज नाही, असे राहुल नार्वेकर यांनी म्हटले.
आणखी वाचा