(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राहुल गांधी यांनी वायनाड सोडून रायबरेली का निवडलं? 5 मुद्द्यांमध्ये समजून घ्या काँग्रेसची आक्रमक रणनीति!
Rahul Gandhi Resign as an MP : केरळमधील वायनाडची पोटनिवडणूक प्रियांका गांधी लढवणार आहेत. राहुल गांधींनी वायनाडची जागा सोडण्यामागे काँग्रेसची नेमकी रणनिती काय? जाणून घेऊयात सविस्तर...
Rahul Gandhi To Resign From Wayanad : नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघ (Wayanad Lok Sabha Constituency) सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ते रायबरेलीचे खासदार राहतील आणि वायनाडची खासदारकी सोडतील. याबाबत स्वतः काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी माहिती दिली. वायनाड जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार असतील, असं मल्लिकार्जुन खर्गे यांनी जाहीर केलं.
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) राहुल गांधींनी वायनाड आणि रायबरेली (Raebareli Lok Sabha Election) या दोन्ही जागा मोठ्या मताधिक्यानं जिंकल्या होत्या. नवी दिल्लीतील पक्षप्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी झालेल्या चर्चेनंतर काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वानं पत्रकार परिषदेत हा मोठा निर्णय जाहीर केला.
2019 मध्ये गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीमध्ये राहुल गांधी भाजपच्या स्मृती इराणी यांच्याकडून पराभूत झाले. त्यावेळी केरळमधील वायनाडनं त्यांना प्रतिनिधी म्हणून निवडून दिलं आणि त्यांना लोकसभेत पाठवलं. मग राहुल गांधी यांनी कठीण काळात साथ देणारं वायनाड सोडून रायबरेली का निवडलं? असा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे. तर, राजकीय विश्लेषकांच्या मते, काँग्रेस आणि राहुल गांधींनी घेतलेला हा निर्णय म्हणजे, पक्षाच्या रणनितीचा मओठा भाग आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानं उत्साहित होऊन काँग्रेस आक्रमक भूमिका घेत असल्याच्या सध्या चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. लेखक आणि राजकीय विश्लेषक रशीद किडवाई यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचा हा निर्णय एक मजबूत आणि विचारशील राजकीय संदेश आहे.
किडवाई यांच्या मते, 2029 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी काँग्रेसला वेळेचा सदुपयोग करायचा आहे. नरेंद्र मोदी 2014 आणि 2019 च्या तुलनेत राजकीयदृष्ट्या कमकुवत स्थितीत आहेत, कारण यावेळी भाजपचं नाहीतर एनडीएचं सरकार आहे आणि भाजपला पूर्ण बहुमत नाही. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi Vadra) या दोघांनाही संसदेत ठेवून विरोधकांची बाजू मजबूत करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी काँग्रेसच्या प्रचाराचं नेतृत्व केलं.
जाणून घेऊयात... राहुल गांधी यांनी पडत्या काळात पाठीशी ठामपणे उभं राहणाऱ्या केरळमधील वायनाडऐवजी उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातून खासदार होण्याचं का निवडलं? महत्त्वाची पाच कारणं काय?
उत्तर प्रदेशातील जनतेचा गमावलेला विश्वास पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न
2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं उत्तर प्रदेशात सहा जागा जिंकल्या. 2019 मध्ये काँग्रेसच्या वाट्याला फक्त रायबरेलीची जागा आली होती. तर, यंदाच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीनं तब्बल 43 जागा जिंकल्या आहेत. त्यापैकी समाजवादी पक्षानं 37 जागा जिंकल्यात. 2019 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या 80 पैकी 62 जागा जिंकणाऱ्या एनडीएसाठी हा मोठा धक्का होता. 2024 च्या निवडणुकीत एनडीएला केवळ 36 जागा जिंकता आल्या, तर भाजपला 33 जागा मिळाल्या. मायावतींच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पक्षाचा (BSP) मतांच्या संख्येत सर्वात मोठा पराभव झाला. त्यांची मतांची टक्केवारी 19 टक्क्यांवरुन 9 टक्क्यांपर्यंत घसरली. ही मतं प्रामुख्यानं काँग्रेस आणि समाजवादी पक्षाकडे गेली. जर सपाला बसपाला 6-7 टक्के मतं मिळाली, तर काँग्रेसच्या मतांमध्ये 2-3 टक्के वाढ झाली. उत्तर प्रदेशात दलित, मुस्लिम आणि ब्राह्मण मतांचा फायदा उठवता येईल, अशी काँग्रेसला आशा आहे. राहुल गांधींनी वायनाडऐवजी रायबरेलीची जागा निवडण्याच्या काँग्रेसच्या रणनितीमागील हे पहिलं कारण असल्याचं पाहायला मिळतंय.
रणनिती बदलण्यामागे काँग्रेसची आक्रमक भूमिका
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानं भाजपला मोठा धक्का दिला आहे. यंदा भाजपला स्वबळावर सरकार स्थापन करता आलं नसून सरकार स्थापनेसाठी मित्रपक्षांची मदत घ्यावी लागली आहे. अशातच यंदा देशभरात काँग्रेसला मोठं यश मिळाल्याचं पाहायला मिळालं. 2024 च्या लोकसभा निकालानंतर काँग्रेसला पुन्हा नवसंजीवनी मिळाल्याच्या सध्या चर्चा सुरू आहेत. अशातच आता मिळालेल्या यशावरुन काँग्रेसनं आपली पुढची रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसनं आपली भूमिका काहीशी बदलल्याचं पाहायला मिळत आहे. राहुल गांधींनी रायबरेलीतून खासदारकी निवडून वायनाडची जागा सोडण्यामागे मोठा अर्थ आहे. काँग्रेस आता आक्रमक झाली आहे.
वायनाडचे खासदार म्हणून राहुल गांधी दक्षिण आणि प्रियंका गांधी उत्तरेकडची कमान सांभाळत होत्या. ही काँग्रेसची जुनी रणनीती होती. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या निकालातून धडा घेत काँग्रेसनं आपली रणनीती बदलली आहे. राजकीय विश्लेष किडवाई म्हणतात की, महाराष्ट्र, राजस्थान आणि यूपीमधील चांगल्या कामगिरीमुळे काँग्रेसला आशा निर्माण झाली आहे आणि परिणामी त्यांच्या रणनीतीत बदल झाला आहे. ते यशस्वी होतील की नाही, हे येणारा काळच सांगेल. भाजपला आव्हान द्यायचं असेल, तर दक्षिणेतून नव्हे तर भगवा पक्ष मजबूत असेल, तिथेच लढा द्यावा लागेल. हिंदी हार्टलँडमध्ये भाजपची ताकद खूपच मजबूत आहे. ती अजूनही दक्षिणेत जमीन शोधण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र आजपर्यंत त्यात फारसे यश आलेले नाही.
काँग्रेससाठी उत्तर प्रदेश अत्यंत महत्त्वाचं
असं म्हटलं जातं केंद्रातील सत्तेचा रस्ता उत्तर प्रदेशातून जातो. त्यामुळेच 2014 पासून ज्यावेळी काँग्रेसला उतरती कळा लागली, त्यावेळी त्यांना सर्वात मोठा धक्का उत्तर प्रदेशात बसला.
केंद्रातील सत्तेवरील त्यांची पकडही ढिली होऊ लागली. काँग्रेसला केंद्रात स्वबळावर सत्तेवर यायचं असेल, तर त्यांना उत्तर प्रदेशात पुनरुज्जीवन करावं लागेल. समाजवादी पक्षासोबत राहून हा विजय मिळाला असला तरी उत्तर प्रदेशात सहा जागा जिंकणं काँग्रेससाठी चांगलं लक्षण आहे. काँग्रेससाठी आणखी एक चांगलं लक्षण म्हणजे, जाट नेते जयंत चौधरी आणि त्यांचा राष्ट्रीय लोकदल (आरएलडी) एनडीएच्या शिबिरात असूनही, यूपी आणि हरियाणातील जाट मतदारांचा कल मात्र काँग्रेसकडे आहे.
मनं जिंकण्यासाठी काँग्रेसला सर्वात आधी हार्टलँड जिंकावं लागेल
मनं जिंकण्यासाठी काँग्रेसला हार्टलँड जिंकावा लागेल. या ठिकाणी भाजपला एकट्यानं आणि प्रादेशिक मित्रपक्षांशी युती करून मुकाबला करावा लागणार आहे. हार्टलँडच्या नऊ प्रमुख राज्यांमध्ये काँग्रेसला आपली कामगिरी सुधारावी लागेल, कारण लोकसभेच्या 543 पैकी 218 खासदार या नऊ राज्यांतून येतात. यावेळी उत्तर प्रदेश व्यतिरिक्त हरियाणा आणि राजस्थानमध्येही काँग्रेसनं चांगली कामगिरी केली आहे.
राजकीय विश्लेषक रशीद किडवई म्हणतात, काँग्रेस हिंदी पट्ट्यात आपल्या शक्यतांचा शोध घेत आहे आणि त्यामुळेच राहुल गांधींना उत्तर प्रदेशमधून बढती दिली जात आहे. यूपीमध्ये अधिक जागा जिंकून, काँग्रेस बिहारमध्येही प्रभाव पाडू शकते, जिथे ते राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) सोबत युती करते.
प्रियांका गांधींमुळे केरळला दिलासा
केरळमध्ये 2026 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असून येथे काँग्रेसची सत्ता येऊ शकते. केरळमधील लोक सीपीएमच्या नेतृत्वाखालील एलडीएफ किंवा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफला निवडत आहेत. राज्यातील जनतेनं 2021 मध्ये एलडीएफला सत्तेत परत करून बहुतेक राजकीय विश्लेषकांना आश्चर्यचकित केलं होतं. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सीपीआय (एम) नं खराब कामगिरी केली आणि फक्त एक जागा जिंकली. 2024 मध्ये लोकसभेच्या 20 पैकी 14 जागा काँग्रेसने जिंकल्या, तर त्यांचा मित्रपक्ष IUML ने दोन जागा जिंकल्या.
जरी राहुल गांधींनी वायनाड सोडून रायबरेलीची निवड केली असली तरिदेखील 2026 च्या विधानसभा निवडणुकीत वायनाडची जनता काँग्रेसचीच साथ देईल, असा ठाम विश्वास काँग्रेसला आहे. प्रियंका गांधी त्यांचा भाऊ राहुलच्या जागी वायनाडमधून निवडून आल्यास राज्य विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रचारालाही वेग येईल.