Rahul Gandhi : वायनाडमध्ये मतदार वाढले तर 'लोकशाही', नागपुरात वाढले तर 'चोरी' कशी? राहुल गांधींच्या गंभीर आरोपांवर भाजपकडून आकडेवारीसह प्रत्युत्तर
Rahul Gandhi : नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकलेल्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात पाच महिन्यांत मतदारसंख्येत 8 टक्क्यांनी वाढ झाली, असा आरोप राहुल गांधींनी केलाय.

Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका दैनिकामध्ये लेख लिहून नोव्हेंबर 2024 मध्ये पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त केला होता. आता त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधत मतदार यादीतील अनियमिततेकडे लक्ष वेधले आहे. राहुल गांधींचा आरोप आहे की, नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मतदारसंघात केवळ पाच महिन्यांत मतदारसंख्येत तब्बल 8 टक्क्यांनी वाढ झाली. त्यांच्या या आरोपांवर आता भाजपने (BJP) आकडेवारीसह प्रत्युत्तर दिले आहे.
भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत म्हटले आहे की, राहुल गांधी म्हणतात की, देवेंद्रजी फडणवीस यांच्या मतदारसंघात ८ टक्के वाढ झाली. जरा राहुल गांधींच्या वायनाड मतदारसंघात काय झालं होतं ते बघूयात.
वायनाड (राहुल गांधी यांचा मतदारसंघ)
2019 मध्ये मतदार – 13,57,819
2024 मध्ये मतदार – 14,62,423
वाढ – +1,04,604 (7.7%)
(स्त्रोत: निवडणूक आयोग)
नागपूर साउथ वेस्ट (देवेंद्रजी फडणवीस यांचा मतदारसंघ)
2019 मध्ये मतदार – 3,84,355
2024 मध्ये मतदार – 4,11,241
वाढ – +26,886 (6.99%)
(स्त्रोत: निवडणूक आयोग)
राहुल गांधींचा आरोप म्हणजे निव्वळ दुटप्पीपणाचा नमुना
वायनाडमध्ये झालेली वाढ 'लोकशाही' आणि महाराष्ट्रात झाली की ती “चोरी”? हा कुठला न्याय आहे? महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, नागपूरसारख्या भागांत स्थलांतर आणि नवमतदारांमुळे ५ ते ८ टक्के मतदारवाढ होतेच. त्यामुळे राहुल गांधींचा आरोप म्हणजे निव्वळ दुटप्पीपणाचा नमुना आहे. आपल्या मतदारसंघात मतदार वाढले तर जागरूक मतदार महाराष्ट्रात मतदार वाढले तर बनावट मतदार? Vote Theft नाही, Truth Theft सुरु आहे. राहुल गांधी त्याचेच प्रमुख शिल्पकार आहेत. बाकी तुमच्या नेतृत्वात कांग्रेसचा किती टक्के निवडणुकीत पराभव झाला याची तपशीलवार आकडेवारीही जाहीर करून टाका, असे म्हणत नवनाथ बन यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर आले आहे.
राहुल गांधी म्हणतात की देवेंद्रजी फडणवीस यांच्या मतदारसंघात ८% वाढ झाली.
— Navnath Kamal Uttamrao Ban (@NavnathBanBJP) June 24, 2025
जरा राहुल गांधींच्या वायनाड मतदारसंघात काय झालं होतं ते बघूयात.
वायनाड (राहुल गांधी यांचा मतदारसंघ)
➡️ 2019 मध्ये मतदार – 13,57,819
➡️ 2024 मध्ये मतदार – 14,62,423
➡️ वाढ – +1,04,604 (7.7%)
(स्त्रोत:… https://t.co/ty95TILN1Z
राहुल गांधींचा आरोप काय?
राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्या मतदारसंघातून निवडून आले, त्या मतदारसंघात केवळ पाच महिन्यांत मतदारसंख्येत तब्बल 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. काही निवडणूक बूथवर ही वाढ 20 ते 25 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. काही बूथ लेव्हल अधिकाऱ्यांनी (BLO) अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याची नोंद केली आहे, तसेच पडताळणी न झालेल्या पत्त्यांवर हजारो नव्या मतदारांची नावं नोंदवण्यात आली आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत विचारलं की, “अशा प्रकारचे प्रकार समोर येत असताना निवडणूक आयोग गप्प का आहे? की तो देखील यामध्ये सहभागी आहे?” यासोबतच त्यांनी “मशीन-रीडेबल डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज तात्काळ जाहीर करावे,” अशी मागणी केली आहे.
आणखी वाचा
























