मोठी बातमी : प्रीतम मुंडे यांच्या पुनर्वसनाच्या हालचाली, शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून विधानसभा लढवणार?
Ahmednagar Lok Sabha: मुंडे कुटुंबीय आणि पाथर्डीचं एक वेगळ नातं आहे. स्व. गोपीनाथ मुंडे म्हणायचे परळी माझी माय असेल, तर पाथर्डी माझी मावशी आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे आणि पाथर्डीचंही तसंच नातं आतापर्यंत आहे.
Ahmednagar Lok Sabha Election 2024 : अहमदनगर : एकीकडे लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) धामधूम सुरू आहे. तर दुसरीकडे आतापासूनच विधानसभेचे (Vidhan Sabha Election 2024) देखील वेध लागले आहेत. अशातच भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, सध्याच्या विद्यमान खासदार आणि पंकजा मुंडे यांची बहिण असलेल्या प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांचा पत्ता मात्र पक्षाकडून कापण्यात आला आहे. पंकजा मुंडेंना उमेदवारी दिली, पण त्यासाठी प्रीतम मुंडे यांना आपली जागा सोडावी लागली. मात्र, असं असलं तरीदेखील प्रीतम मुंडे यांनी शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात (Shevgaon Pathardi Constituency) उमेदवारी द्यावी, असा सूर काही कार्यकर्त्यांमधून आळवू लागल्याचं पाहायला मिळत आहे.
मुंडे कुटुंबीय आणि पाथर्डीचं एक वेगळ नातं आहे. स्व. गोपीनाथ मुंडे म्हणायचे परळी माझी माय असेल, तर पाथर्डी माझी मावशी आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे आणि पाथर्डीचंही तसंच नातं आतापर्यंत आहे. पंकजा मुंडे यांनी शेवगाव-पाथर्डीमधून विधानसभा लढवावी, अशी अनेक वेळा मागणी झाली होती. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे. त्यासाठी प्रीतम मुंडे यांना आपली जागा सोडावी लागली. आता प्रीतम मुंडे यांनी शेवगाव-पाथर्डीतून विधानसभा लढवावी, अशी भावना व्यक्त होताना दिसत आहे.
मधल्या काळात पंकजा मुंडे यांनी शेवगाव-पाथर्डीतून विधानसभा लढवावी अशी लोकांची भावना होती. मात्र, आता प्रीतम मुंडे यांच्याही नावाची चर्चा होत आहे. जर प्रीतम मुंडे यांना शेवगाव-पाथर्डीतून लढण्याची इच्छा असेल, तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत आणि त्यांनी शेवगाव-पाथर्डीतून निवडणूक लढवावी, अशी माझी भूमिका आहे, असं भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश सचिव अरुण मुंढे यांनी म्हंटलं आहे.
प्रीतम मुंडेंना पाथर्डी-शेवगावमधून उमेदवारी दिली तर त्यांना निवडून आणू; कार्यकर्त्यांचा आग्रह
शेवगाव-पाथर्डी विधानसभेच प्रतिनिधित्व भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे या करतात. मोनिका राजळे यांच्या विजयात मुंडे कुटुंबीयांचा मोठा वाटा आहे. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात वंजारी समाजाचा मतदार मोठ्या संख्येनं आहे. त्यामुळे मुंडे कुटुंबाचा या मतदारांवर मोठा प्रभाव आहे. त्यातच आता भाजपमधीलच काही पदाधिकाऱ्यांनी प्रीतम मुंडे यांनी पाथर्डी-शेवगाव मधून उमेदवारी दिली तर त्यांना निवडून आणू असं म्हटलं आहे.
दरम्यान, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अहमदनगर दौऱ्यावर असलेल्या पंकजा मुंडे यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आताच या प्रश्नाचं उत्तर देण्याची गरज नाही. माझ्या शेजारी शेवगाव-पाथर्डीच्या आमदार बसलेल्या आहेत, त्यांचं टेन्शन वाढवण्याचं कारण नाही. पुनर्वसन हा विषय त्यांच्यासाठी असतो, जो एखाद्या गोष्टींनं ग्रस्त असतो. मात्,र आम्ही कोणत्याही गोष्टीनं ग्रस्त नाहीये, असं म्हंटलं आहे.
प्रीतम मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यासाठी आपली लोकसभेची जागा सोडली. मात्र, आता येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत प्रीतम मुंडे यांचं शेवगाव-पाथर्डीतून पुनर्वसन होणार का? की भाजप वेगळ्या पद्धतीनं प्रीतम मुंडे यांचा सन्मान करणार? हे पाहावं लागणार आहे.