Ahmednagar : सुजय विखेंना पैशाची मस्ती, गरीबांची ते अशीच टिंगल करतात; 'इंग्रजी'च्या आव्हानावर निलेश लंकेंचा टोला
Sujay Vikhe Vs Nilesh Lanke : आधी म्हणायचं आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवारच लोकाची कामं करू शकतात, दुसरीकडे सांगायचं की निलेश लंकेला इंग्रजी बोलता येत नाही, ही त्यांच्याकडे असलेल्या पैशाची मस्ती असल्याची टीका निलेश लंके यांनी केली.
अहमदनगर : नगर लोकसभा मतदारसंघात (Ahmednagar Lok Sabha Constituency) होणाऱ्या एकमेकांच्या कामावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी आता एकमेकांच्या शिक्षणाकडे वळाल्याचं दिसून येतंय. महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी माझ्या एवढे इंग्रजीत बोलून दाखवावे, भलेही महिनाभर वेळ घेऊन पाठ करून बोलून दाखवावे, मी उमेदवारी अर्ज भरणार नाही असं आव्हान अहमदनगर दक्षिण लोकसभेचे भाजपचे उमेदवार सुजय विखेंनी (Sujay Vikhe Patil) दिलं होतं. या टीकेला निलेश लंके यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं. सुजय विखे हे श्रीमंत कुटुंबातील आहेत, ते माझ्यासारख्या गरीब उमेदवाराची अशाच पद्धतीने टिंगल करतील, ही त्यांच्याकडे असलेल्या पैशाची मस्ती आहे असं प्रत्युत्तर निलेश लंके यांनी दिलं.
सुजय विखेंना पैशाची मस्ती
इंग्रजी बोलणण्यावरून सुजय विखेंनी केलेल्या टीकेला निलेश लंकेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, समोरचे उमेदवाराकडे असलेल्या पैशाची मस्ती आहे. एका बाजूला सांगायचं की जे सक्षम आहे त्यांनीच राजकारण करायचं, दुसरीकडे सांगायचं निलेश लंकेला इंग्रजी बोलता येत नाही. पण मी एका शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलो आहे. त्यामुळे मी इंग्लिश मीडियम शाळेत शिक्षण घेऊ शकलो नाही.
निलेश लंके यांनी सुजय विखेंना प्रत्युत्तर देत अहमदनगर दक्षिण लोकसभेची निवडणूक ही गरीब विरुद्ध श्रीमंत अशी असल्याचं म्हटलं. सोबतच तुम्ही वैयक्तिक टीकाटिप्पणी करण्यापेक्षा पाच वर्षात काय काम केलं यावर बोला असं आव्हान निलेश लंकेंनी दिलं आहे.
काय म्हणाले होते सुजय विखे?
नगरचे भाजप उमेदवार सुजय विखेंनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांच्यावर टीका करताना त्यांचे शिक्षण काढलं होतं. निलेश लंकेंनी पाठांतर करून का होईना, माझ्याएवढं इंग्रजी बोलावं, मी नगरमधून उमेदवारी अर्ज मागे घेईन असं आव्हान सुजय विखेंनी दिलं होतं.
सुजय विखेंच्या या आव्हानावर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली. रोहित पवार टीका करताना म्हणाले की, लोकप्रतिनिधीला इंग्रजी-हिंदी समजते की नाही हे महत्वाचं नसतं तर लोकप्रतिनिधीला जनतेची भाषा, त्यांच्या अडचणींची भाषा समजली पाहिजे आणि जनतेची भाषा समजण्यात आम्ही दिलेले उमेदवार माहीर आहेत. नाहीतर इंग्रजी-हिंदी येऊनही संसदेत गप्प बसणाऱ्या भाजप खासदारांची, प्रश्नांची उत्तरं न देता येणाऱ्या मंत्र्यांची संख्या काही कमी नाही.
ही बातमी वाचा: