Nagpur : एकमेकांचं तोंडही न बघणारे काँग्रेसचे तीन दिग्गज पहिल्यांदाच एकत्र, एकाच गाडीतून प्रवास, गडकरींना बालेकिल्ल्यात घेरणार?
Nagpur Lok Sabha Election : एकमेकांचे कट्टर विरोधक समजले जाणारे विलास मुत्तेमवार, सतीश चतुर्वेदी आणि नितीन राऊत या तीन नेत्यांनी एकाच गाडीमधून प्रवास केल्याने नागपूर लोकसभेची गणितं बदलणार असल्याची चर्चा सुरू आहे.
नागपूर : काँग्रेस नागपूर लोकसभा मतदारसंघातून (Nagpur Lok Sabha Election) कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना एक मोठी घडामोड घडली आहे. काँग्रेसचे तीन दिग्गज नेते आणि कधीकाळी पक्षांतर्गत एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले विलास मुत्तेमवार (Vilas Muttemwar) , सतीश चतुर्वेदी (Satish Chaturvedi) आणि नितीन राऊत (Nitin Raut) एकाच कारमधून जाताना पाहायला मिळाले. त्यामुळे काँग्रेसने या ठिकाणी तगडा उमेदवार देऊन भाजपच्या नितीन गडकरींना (Nitin Gadkari) घेरण्याची तयारी सुरू केली आहे.
काँग्रेसची विदर्भात मोठी ताकद असतानाही त्या ठिकाणी अंतर्गत वादामुळे पक्षाचं मोठं नुकसान झालं. नागपूरमधील काँग्रेसचे नेते एकमेकांचं तोंडही बघत नसल्याचं चित्र आहे. त्यामध्ये विलास मुत्तेमवार, सतीश चतुर्वेदी आणि नितीन राऊत यांचं नाव घेतलं जातं. पण आज तिघेही एकत्रित दिसले आणि या तिघांनीही एकाच गाडीतून प्रवास केला.
नागपूरमध्ये काँग्रेस तगडा उमेदवार देणार
विलास मुत्तेमवार, सतीश चतुर्वेदी आणि नितीन राऊत हे तिघेही बाहेरून नागपूर विमानतळावर दाखल झाले आणि एकाच कारमधून रवाना झाले. नागपूर लोकसभेच्या उमेदवारीवर या तिघांनीही कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र नागपुरात काँग्रेस मजबूत उमेदवार देईल, लवकरच काँग्रेसचा उमेदवार सर्वांच्या समोर असेल अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली.
नागपूरमधून काँग्रेसच्या तिकिटासाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्यामध्ये विकास ठाकरे, अभिजित वंजारी यांचे नाव आघाडीवर आहे. तसेच माजी खासदार राम हेडाऊ यांचे पूत्र संजय हेडाऊ याचंही नाव चर्चेत आहे. नागपूरमधील जातीय समीकरण लक्षात घेता या ठिकाणी कुणबी किंवा ओबीसी उमेदवार देण्यात येईल अशी चर्चादेखील आहे.
गेल्या दोन निवडणुकीवेळी मोदी लाट असतानाही काँग्रेसच्या उमेदवाराने तीन लाखाहून अधिक मतं घेतल्याचं दिसून आलं. त्यामुळे या ठिकाणी काँग्रेस चांगली लढत देऊ शकते.
भाजपकडून नितीन गडकरी तिसऱ्यांदा लोकसभेचे उमेदवार
भाजपने जाहीर केलेल्या तिसऱ्या यादीत नितीन गडकरी यांना नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर गडकारींनी स्वत: मैदानात उतरून आपला प्रचाराचा नारळ फोडला आहे. ‘कहो दिल से, नितीन गडकरी फिर से’ अशा आशयाचा मजकूर असलेल्या स्प्रे पेंटिंगचे अनावरण गडकरींनी केलं आणि प्रचाराला सुरूवात केली.
ही बातमी वाचा :
- मोठी बातमी : प्रचार सुरु केलेल्या चंद्रहार पाटील यांना उद्धव ठाकरेंचा फोन, सांगलीच्या उमेदवारीवर मोठं भाष्य