Ladki Bahin Yojana : आता लाडक्या बहिणींसाठी विरोधकही आले पुढे, सत्तेत आल्यास रकमेत करणार मोठी वाढ; बड्या नेत्याने थेट आकडा सांगितला!
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आता विरोधकही सरसावल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीतील बड्या नेत्याने सत्ता आल्यास योजनेच्या रकमेत मोठी वाढ करणार असल्याचे म्हटले आहे.
मुंबई : यंदाच्या अर्थसंकल्पात महायुती सरकारने (Mahayuti Government) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (CM Ladki Bahin Yojana) घोषणा केली. या योजनेत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना आर्थिक मदत शासनाकडून दिली जात आहे. या योजनेचा पहिला हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होत आहे. अनेक महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये जमा झाले आहेत. सरकारकडून या योजनेचा जोरदार प्रचार केला जात आहे. त्यातच आता लाडक्या बहिणींसाठी विरोधक देखील पुढे आल्याचे दिसून येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लाडक्या बहीण योजनेबाबत महत्त्वाचे भाष्य केले आहे.
आमचं सरकार आल्यावर महिलांना तीन हजार रुपये देणार
लाडके बहीण योजना महायुती सरकारसाठी टर्निंग पॉईंट ठरणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, लाडकी बहिणी योजना टर्निंग पॉईंट अजिबात करणार नाही. कदाचित त्यांच्यासाठी तो यू टर्न ठरेल. महाराष्ट्र सरकारने याआधी अशा खूप योजना राबवलेल्या आहेत. ही काही नवीन योजना नाही. त्यांनी काही फार मोठी नवी क्रांती केलेली नाही. दीड हजार रुपये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे खिशातून देत नाही. लोकांच्या करातूनच हे देत आहेत. या योजनेचा महिलांनी लाभ घेतला पाहिजे. आमचं सरकार येईल तेव्हा 1500 रुपयांचे आम्ही 3000 रुपये करू, हा आमचा शब्द असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
संजय राऊतांची देवेंद्र फडणवीसांवर टीका
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सत्तेत आल्यास सर्व कल्याणकारी योजना बंद करणार आहेत. हे सावत्र भाऊ असल्याची टीका केली होती. यावरून संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. फडणवीस यांना राजकीय इतिहास माहीत नसेल त्यांनी या महाराष्ट्राचे महाभारत समजून घ्यावे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सुडाचे राजकारण करत आहेत. त्यांचे राज्य जाईल, अशी त्यांना भीती वाटत आहे. ते हरत आहोत म्हणून त्यांना भीती वाटते. त्यामुळे ते लोकांना धमक्या देत आहेत. देवेंद्र फडणवीस पडद्यामागून जे कपटकारस्थान करत आहे ते महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. चांगल्या योजना कधीही बंद केला जात नाही. त्यांचे सरकार जाणार असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची झोप उडाल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा