रक्षाबंधनाची भेट देण्यासाठी मुख्यमंत्री, अन् दोन्ही उपमुख्यमंत्री आज पुण्यात येणार; १५ हजारांपेक्षा जास्त लाडक्या बहिणी कार्यक्रमासाठी येणार
Ladki Bahin Yojana: आज पुण्यात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) उपस्थित असणार आहेत.
Ladki Bahin Yojana: राज्यात सध्या सर्वत्र लाडकी बहिण योजनेचा बोलबाला सुरू आहे. राज्यातील आपल्या बहिणींना या योजनेच्या माध्यमातून मदत होईल असं सत्ताधाऱ्यांनी म्हटलं आहे, तर आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने महिला मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी फक्त काही महिन्यांसाठी सुरू केलेली योजना आहे, असं म्हणत विरोधकांनी टीका केली आहे. राज्यातील काही महिलांना या योजनेचा पहिला हप्ता नुकताच खात्यात जमा करण्यात आला आहे. आज या योजनेच्या वितरणाचा कार्यक्रम पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आज शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी याठिकाणी होणार आहे.
कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री- दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित
आज पुण्यात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) उपस्थित असणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुण्यातील बालेवाडीत शुभारंभ करण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यासह अन्य नेतेही उपस्थित असणार आहेत.
कार्यक्रमासाठी 15 हजार महिला राहणार उपस्थित
राज्यातील 15 हजाराहून अधिक लाभार्थी महिला कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. या कार्यक्रमामध्ये प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थींना रक्कम जमा केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. कार्यक्रमावेळी लाभार्थींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, महिलांसाठी बैठक व्यवस्था, पार्किंग, महिलांना कार्यक्रमस्थळी आणण्याची व्यवस्था, आरोग्य तपासणी, भोजन, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे या सर्व गोष्टींची व्यवस्था करण्यात आली आहे.
राज्यातील अनेक महिलांच्या खात्यात रक्कम जमा
राज्यातील अनेक महिलांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. आजपर्यंत पुणे जिल्ह्यातील ५ लाखाहून अधिक लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर या योजनेची रक्कम जमा झाली आहे. उर्वरीत पात्र महिलांच्या खात्यात ही रक्कम रक्षाबंधनादिवशी जमा करण्यात येणार असल्याची माहिती आहे. प्रत्येक पात्र महिलेचा अर्ज तपासून तिला लाभ देण्याची प्रक्रिया लाभ मिळेपर्यंत सुरू राहणार आहे.
वाहतुकीत बदल
आज मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पुणे दौऱ्यावर आहेत या पार्श्वभूमीवर पुणे-सोलापूर, पुणे-सातारा, पुणे-नगर, पुणे-नाशिक, पुणे-मुंबई जुना महामार्ग आणि पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग या सर्व महामार्गांवरील सर्व प्रकारची जड-अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आल्याची माहिती आहे. महामार्गांवरील सर्व प्रकारची जड-अवजड वाहतूक बंद राहणार आहे. तसेच रात्री बारा वाजेपर्यंत ही वाहतूक बंद राहणार आहे. असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे (Suhas Diwase) यांनी दिले आहेत.