मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
शरद पवारांची भेट घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांची सध्या रांग लागली आहे. त्यात, माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे आणि भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे दोन्ही नेते अजित पवार यांच्या गटात आहेत.
पुणे : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांसाठीची रणधुमाळी सुरू असून सर्वच राजकीय पक्ष उमेदवारांची चाचपणी करत आहेत. तर, इच्छुक उमेदवारांनीही प्रमुख पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. लोकसभा निवडणुकांमध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चागलं यश मिळालं. त्यामुळे, त्यांच्या पक्षाकडे उमेदवारांचा कला वाढला असून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार यांच्या पक्षातील काही नेतेही शरद पवरांकडून उमेदवारी मिळावी, यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे, गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांची भेट घेणाऱ्यांची संख्या वाढली असून माढा विधानसभेचे आमदार बबनदादा शिंदे यांनी आणि भोसरीतील माजी आमदार विलास लांडे (Vilas lande) यांनीदेखील शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर, आता विलास लांडे यांचे सुपुत्र विक्रांत लांडे यांनी मोठी घोषणा केली आहे. विलास लांडे विधानसभेला तुतारी फुंकणार असल्याचं त्यांनी म्हटलं.
शरद पवारांची भेट घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांची सध्या रांग लागली आहे. त्यात, माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे आणि भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे दोन्ही नेते अजित पवार यांच्या गटात आहेत. मात्र, या दोन्ही नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या होत्या. तसेच, अजित पवारांच्या पक्षातून संधी मिळणार नसल्याचे लक्षात येत विलास लांडे यांनी शरद पवारांकडून तुतारी फुंकण्याची तयारी दर्शवली आहे. आता, त्यांचे सुपुत्र विक्रांत लांडे यांनी याबाबत घोषणाच केलीय.
अजित पवार गटाचे भोसरीतील माजी आमदार विलास लांडे तुतारी फुंकणार असल्याचं त्यांचे पुत्र विक्रांत लांडेंनी अखेर जाहीर केलं. आजच्या शरद पवारांच्या भेटीनंतर विक्रांत लांडेंनी प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळं अजित पवारांना बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार पुन्हा एक धक्का देणार, हे स्पष्ट झालंय. शरद पवारांनी तारीख दिली की विलास लांडे घड्याळाच्या हातानेचं तुतारी फुंकणार आहेत, असं विक्रांत लांडे आता ठामपणे सांगत आहेत. कालच्या प्रमाणेच विलास लांडेंनी यापूर्वी ही अनेकदा शरद पवारांच्या भेटी घेतल्या आहेत. मात्र, त्यांनी स्वतःहून घरवापसीच्या प्रवेशावर कधीचं भाष्य केलेलं नाही, नेहमी त्यांनी संभ्रमाचं राजकारण खेळलेलं आहे. त्यामुळे जोपर्यंत विलास लांडे हातात तुतारी घेत नाहीत, तोपर्यंत त्यांचा प्रवेश निश्चित कसा मानायचा? अशी चर्चा यानिमित्ताने पुन्हा एकदा शहरात रंगलेली आहे. दरम्यान, याच संदर्भात विलास लांडेंचे पुत्र विक्रांत लांडे आणि शरद पवार गटातील त्यांच्या मेव्हणीचे पुत्र अजित गव्हाणेंशी संवाद साधला असता विलास लांडे यांच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्यावर एकप्रकारे शिक्कामोर्तब झालंय.
हेही वाचा
लाडक्या बहिणींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा