Uday Samant Meets Sharad Pawar : उदय सामंत आणि शरद पवार यांची सिल्वर ओकवर भेट, भेटीनंतर उदय सामंत म्हणाले...
राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेनेचे नेते (शिंदे गट) उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज भेट घेतली. शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी त्यांची भेट झाली.
Uday Samant Meets Sharad Pawar : राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेनेचे नेते (शिंदे गट) उदय सामंत (Uday Samant) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची आज भेट घेतली. शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक (Silver Oak) या निवासस्थानी त्यांची भेट झाली. गेल्या काही दिवसांत उदय सामंत तिसऱ्यांदा शरद पवार यांना भेटले आहेत. दरम्यान अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद निवडणूक निकालाच्या निमित्ताने ही भेट झाल्याची माहिती उदय सामंत यांनी बैठकीनंतर दिली. उदय सामंत एबीपी माझाशी बोलत होते.
भेटीबाबत उदय सामंत काय म्हणाले.
"राजकारणाच्या पलिकडेही काही गोष्टी असतात. अखिल भारतीय नाट्य परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे. दोन जिल्ह्यातील निकाल जाहीर होणं अद्याप बाकी आहे. शरद पवार हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे तहहयात विश्वस्त आहे, प्रमुख आहेत. त्यांना या निवडणुकीची माहिती देण्यासाठी आम्ही गेलो होतो. निवडून आलेले सदस्य देखील माझ्यासोबत होते. यापलिकडे दुसरा कोणताही राजकीय विषय किंवा हेतू नव्हता. ज्या व्यक्तीने ही संस्था स्थापन करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली, ज्या व्यक्तीच्या नेतृत्त्वाखाली ही संस्था चालते त्या संस्थेच्या निवडणुकीत नेमकं काय झालंय हे विश्वस्त म्हणून सांगणं ही माझी जबाबदारी आहे. त्या संस्थेत मी देखील विश्वस्त आहे. या नात्यानेच तहहयात विश्वस्त शरद पवार असल्याने त्यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो," अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
अजित पवारांबाबत चर्चा?
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे राज्याच्या राजकारणातील केंद्रबिंदू ठरले आहेत. शरद पवार यांच्या भेटीत अजित पवारांबाबत चर्चा झाली का, या प्रश्नावर उदय सामंत म्हणाले की, "माझ्यासोबत पाच सहा निवडून आलेले सदस्य होते. त्यामुळे त्यांच्यासमोर राजकीय चर्चा होऊ शकणार नाही. सध्या मी त्यांना भेटलो याचा अर्थ राजकीय मुव्हमेंट आम्ही करतोय, असा होत नाही."
नाट्य परिषदेवर अध्यक्ष कोण?
"शरद पवार हे तहहयात विश्वस्त आहेत, मी विश्वस्त आहे. त्यामुळे अध्यक्ष किंवा सेक्रेटरी कोण असावा हे विश्वस्तांनी यात पडण्यात अर्थ नाही. या निवडणुकीशी आमचा संबंध नाही. बहुमताने निवडणूक आलेले सदस्य याबाबत निर्णय घेतील.१९ कार्यकारिणी सदस्य होती, ही कार्यकारिणी अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष, एक कार्यवाहक, खजिनदान आणि दोन सहकार्यवाहक नेमायचे आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक विभागाला प्रतिनिधीत्त्व असावं, हा आमचा आग्रह राहणार आहे. प्रशांत दामले यांच्यासह आणखी एक दोन जण इच्छुक आहेत," असं उदय सामंत यांनी सांगितलं.
मराठा समाजाची बाजू पुन्हा चांगल्या पद्धतीने मांडू : उदय सामंत
मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत बैठक बोलावली आहे. त्याविषयी बोलताना उदय सामंत म्हणाले की, "मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक पावलं टाकत आहेत. मराठा आरक्षणासंदर्भातील समितीत मी सुद्धा काम करत आहे. कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजावर अन्याय होणार नाही, हे दोघांचं धोरण आहे, सरकारचं धोरण आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात काहीही घडलं असलं तरी त्याबाबत कायदेशीर सल्ला घेऊन पुन्हा मराठा समाजाची बाजू चांगल्या पद्धतीने कशी मांडू याबाबत निर्णय घेतला जाईल."