Maval Loksabha : ठाकरेंचा प्रचाराचा धडाका, महायुतीकडे आमदारांची ताकद, नात्यागोत्याचं राजकारण, श्रीरंग बारणेंसमोर तिसऱ्यांदा निवडून येण्याचे आव्हान
Maval Loksabha : मावळ लोकसभा (Maval Loksabha) मतदारसंघात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना आमने-सामने आहे.
Maval Loksabha : मावळ लोकसभा (Maval Loksabha) मतदारसंघात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना आमने-सामने आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विद्यमान खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवले आहे. तर उद्धव ठाकरेंनी संजोग वाघेरे (Sanjog Waghere) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बारणे यांनी सलग दोन निवडणुकांमध्ये विजयश्री खेचून आणली होती. शिवाय 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा पराभवही केला होता. दरम्यान, उद्धव ठाकरे यांना सोडून बारणे यांनी शिदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे उद्धव ठाकरेंना सहानुभूतीचा त्यांना किती फटका बसणार ? हे निकालानंतरच समजणार आहे. दरम्यान सध्या मावळमध्ये कोणाची किती ताकद आहे? कोणते मुद्दे चर्चेत आहेत? जाणून घेऊयात...
मावळमध्ये कोणाचे किती आमदार?
मावळ लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. पनवेल, उरण, कर्जत, पिंपरी, चिंचवड आणि मावळ हे तालुके मावळ लोकसभा मतदारसंघात आहेत. त्यापैकी 3 तालुक्यात भाजपचे आमदार आहेत. दोन आमदार राष्ट्रवादीचे आहेत. तर एक आमदार शिवसेना शिंदे गटाचा आहे. त्यामुळे श्रीरंग बारणे यांना भाजप आणि राष्ट्रवादीच्या आमदारांची साथ मिळणे महत्वाचे असणार आहे. शिवाय, उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळाली, तर बारणेंना मोठा फटका बसू शकतो. उद्धव ठाकरेंनी मावळमध्ये सभा घेत, जनमत खेचण्याचा प्रयत्न केला आहे.
महायुतीची मोठी ताकद, पण वाघेरेंच्या उमेदवारीने मविआला बळ
मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या आमदारांची संख्या मोठी आहे. शिवाय, मावळ लोकसभा मतदारसंघात संघटनात्मक बांधणी पाहिली तर महायुतीचे एकहाती वर्चस्व आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू मानले जाणाऱ्या संजोग वाघेरे यांना उद्धव ठाकरेंनी उमेदवारी दिल्याने निवडणुकीत रंगत आली आहे. शिवाय, संजोग वाघरे आणि श्रीरंग बारणे हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. अनेक मतदारसंघात दोघांचे नातेवाईक प्रचारात उतरल्याचे चित्र आहे.
ठाकरे-पवारांना मिळणाऱ्या सहानुभूती, बारणेंची डोकेदुखी
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना सहानुभूती मिळत असल्याचे चित्र जाणवत आहे. त्यात श्रीरंग बारणेंनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ठाकरे पवारांना मिळणाऱ्या सहानुभूतीचा मोठा फटकाही बारणेंना बसू शकतो. याशिवाय श्रीरंग बारणे गेल्या 10 वर्षांपासून मावळचे खासदार आहेत. त्यामुळे त्यांना अँटी इन्कबंसीलाही सामोरे जावे लागू शकते.
इतर महत्वाच्या बातम्या