Manoj Jarange: मनोज जरांगे पाटलांचा सोशल मिडिया रोहित पवारांकडून मॅनेज; आमदार राऊतांचा दावा
मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी गेल्या महिन्यात शांतता रॅली काढली होती. त्यानंतर, आता घोंगडी बैठकांच्या माध्यमातून ते मराठा समाजातील (Maratha) लोकांपर्यंत पोहोचत आहेत.
सोलापूर : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आता घोंगडी बैठकीच्या माध्यमातून मराठा समाज बांधवांशी संवाद साधायला सुरुवात केली आहे. या दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी बार्शीतील आमदार राजेंद्र राऊत यांच्या भाषणाचा संदर्भ देत त्यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर, आमदार राऊत यांनीही जरांगेंना थेट आव्हान दिलं. त्यावरुन मनोज जरांगे आणि आमदार राऊत यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसून येते. आमदार राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे यांच्या सोशल मिडिया टीमकडून होत असलेल्या टीकेंवर बोलताना आमदार रोहित पवार यांना लक्ष्य केलं. मनोज जरांगे यांचा सोशल मिडिया रोहित पवार यांच्याकडून मॅनेज केला जातं असल्याचा दावा राऊत यांनी केलाय. तसेच, शरद पवार यांचा बार्शी दौरा झाल्यापासूनच बार्शीत माझ्याविरुद्ध राजकारण होत असल्याचंही त्यांनी म्हटलं.
मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी गेल्या महिन्यात शांतता रॅली काढली होती. त्यानंतर, आता घोंगडी बैठकांच्या माध्यमातून ते मराठा समाजातील (Maratha) लोकांपर्यंत पोहोचत आहेत. मात्र, जरांगेंच्या बैठका किंवा दौऱ्यासाठी रोहित पवारांची टीम सोशल मिडिया मॅनेजमेंटचं काम करते, असा दावा आमदार राऊत (Rajendra Raut) यांनी केला आहे. जरांगे यांचे जिथे आंदोलन आहे, तिथं रोहित पवारांची टीम आधी जाते. सगळी व्यवस्था होते, मगच सगळं आंदोलन केलं जातंय. माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या घरी शरद पवार येऊन गेले तेव्हापासून हे सुरु आहे, मला वाटतं हे सगळं कट कारस्थान रोहित पवार यांनी केलंय, असा माझा संशय आहे, असेही राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे, आमदार राऊत यांच्या आरोपावर आता रोहित पवार काय भूमिका मांडणार हे पाहावं लागेल. दरम्यान, राऊत यांनी ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली असून त्यासाठी आंदोलन करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
23 सप्टेंबरपासून आंदोलन
या महिन्यातील 23 तारखेपासून मी बार्शीत दररोज आंदोलन करणार असल्याचं राऊत यांनी सांगितलं. मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी अधिवेशन बोलवावं या मागणीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोपर्यंत पाठिंबा देत नाहीत, तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरुच राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, राऊत यांनी रविवारी सकाळी पत्रकार परिषद घेत विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे. त्यानंतर, आज पत्रकार परिषद घेत 23 सप्टेंबरपासून आंदोलन करणार असल्याची भूमिकाही जाहीर केली आहे.
मला सुरक्षा देण्याबाबत सरकारने विचार करावा?
मी पत्रकार परिषद घेतल्यानंतर आता मला फोन करुन अनोळखी लोकांनी शिव्या द्यायला सुरुवात केलीय. पण, मी घाबरणारा नाही, जशाच तस उत्तर मी दिलंय. पण हे आता बंद करा, असे म्हणत राऊत यांनी सोशल मिडियातून होणाऱ्या व त्यांना येत असलेल्या फोनकॉल्ससंदर्भात भाष्य केलं. तसेच, माझं घर पेटवायची तयारी जरांगे यांची सुरु आहे का?, बार्शीत जर असा नक्षलवाद होणार असेल तर सरकारने विचार करावा. मला सरकारने सुरक्षा द्यायची का, हाही विचार की करावा, कारण सुरक्षेची जबाबदारी त्यांची आहे, असेही राऊत यांनी म्हटलं आहे.
जरांगे सातत्याने भूमिका बदलतात
मनोज जरांगेना नेमकं काय हवंय एकदा त्यांनी ठरवून ड्राफ्ट तयार करावा, मग रोज सह्यादीला बैठक करून हा विषय मार्गी लावू. सगे सोयरेच्या मुद्याला 7 लाख हरकत आल्या आहेत, त्यामुळे कायदेशीर लढाई होणारच आहे. मराठा बांधवाना हात जोडून विनंती आहे की, कायदेशीर लढाई करण्यासाठी जे जे केलं पाहिजे ते करुयात, पण हे आंदोलन भरकट आहेत. प्रत्येकवेळी त्यांची मागणी आणि भूमिका बदलली आहे. आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही सांगाल ते वकील देऊ पण ते म्हणतात वकीलही मीच आणि जज पण मी. म्हणजे प्रश्न सोडवायचं की असच घोंगड भिजत ठेवायचं आहे, असा प्रश्नही राऊत यांनी विचारला आहे.
हेही वाचा
Video : रिक्षाखाली दबलेल्या आईसाठी लेक बनली आदिमाया-आदिशक्ती; मुलीने एकटीनेच रिक्षा उचलली