इंडिया आघाडीचं सरकार आलं तर बाहेरुन समर्थन देणार; पाचव्या टप्प्याच्या मतदानापूर्वी ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
Mamata Banerjee on INDIA Allince : काही दिवसांपूर्वीच ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीसोबत कोणत्याही प्रकारची युती नसल्याचं मोठं वक्तव्य केलं होतं. पण आता केंद्रात इंडिया आघाडीचं सरकार आलं तर बाहेरुन पाठिंबा देऊ असं ममता बॅनर्जींनी म्हटलं आहे.
Mamata Banerjee Vows Outside Support To INDIA Alliance : नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) केंद्रात इंडिया आघाडीचं (INDIA Alliance) सरकार स्थापन झाल्यास त्यांचा पक्ष (तृणमूल काँग्रेस) नव्यानं स्थापन होणाऱ्या (इंडिया आघाडीच्या सरकारला) सरकारला बाहेरून पाठिंबा देईल, अशी मोठी घोषणा केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वीच ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीसोबत कोणत्याही प्रकारची युती नसल्याचं मोठं वक्तव्य केलं होतं. दरम्यान, ममता बॅनर्जींच्या इंडिया आघाडीला पाठिंबा देण्याच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसनं इंडिया आघाडीला आपला जाहीर पाठींबा व्यक्त केलेला. पण ऐन लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीतच ममता बॅनर्जींनी इंडिया आघाडीसोबत काडीमोड घेत, पश्चिम बंगालमध्ये 'एकला चलो रे' ची भूमिका घेतली. त्यावेळी ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीत काँग्रेससोबतच्या जागावाटपावर असहमती दर्शवली होती, त्या म्हणाल्या होत्या की, 'इंडिया आघाडीच्या स्थापनेत मी महत्त्वाची भूमिका बजावली होती. विरोधी पक्षांच्या युतीचं नावंही मीच दिलेलं होतं. पण इथे पश्चिम बंगालमध्ये सीपीआय (एम) आणि काँग्रेस भाजपसाठी काम करत आहेत."
एका कार्यक्रमात बोलताना बुधवारी ममता बॅनर्जींनी आपल्या मागील वक्तव्यांचा पुनरुच्चार करत म्हटलं की, "बंगालमध्ये सीपीआय(एम) आणि काँग्रेसवर विश्वास ठेवू नका. ते आमच्यासोबत नाहीत, ते इथे भाजपसोबत आहेत." ममता बॅनर्जी यांनी भाजपवर हल्लाबोल करत 'चोरांनी भरलेला पक्ष' असा उल्लेख केला. त्या म्हणाल्या की, 400 पार करण्याचं महत्त्वाकांक्षी निवडणूक लक्ष्य गाठण्यात भाजप अपयशी ठरेल.
भाजप चोरांचा पक्ष... : ममता बॅनर्जी
ममता बॅनर्जींनी भाजपवर टीका करताना चोरांचा पक्ष असा उल्लेख केला. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "भाजप सातत्यानं दावा करतंय की, ते 400 जागा जिंकतील, पण लोकांचं असं म्हणणं आहे की, असं अजिबात होणार नाही. संपूर्ण देश समजून गेलाय की, भाजप चोरांनी भरलेला पक्ष आहे. आम्ही (TMC) सरकार स्थापन करण्यासाठी आणि त्यांना सर्वोतोपरी मदत करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर इंडिया आघाडीला बाहेरून पाठिंबा देऊ. बंगालमधील आमच्या माता-भगिनींना कधीही कोणतीही अडचण येणार नाही आणि 100 दिवसांच्या नोकरीच्या योजनेत सहभागी होणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही, याची काळजी घेणारं सरकार आम्ही स्थापन करू."
ममता बॅनर्जी पुढे बोलताना म्हणाल्या की, "मी दिल्लीतील इंडिया आघाडीबाबत बोलतेय. यामध्ये सीपीएम किंवा बंगाल काँग्रेस सहभागी नाही." ममता बॅनर्जी म्हणाल्या की, त्यांचा पक्ष केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी इंडिया ब्लॉकला पाठिंबा देईल. ममता बॅनर्जी यांनीही नागरिकत्व कायदा (CAA) रद्द करण्याची शपथ घेतली. त्या म्हणाल्या की, भाजप सरकार सत्तेतून बाहेर पडल्यास राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) आणि समान नागरी संहिता (UCC) ची अंमलबजावणी थांबवली जाईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :