(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vidhan Sabha Election 2024: भाजपला मोठा धक्का, पिचड पिता-पुत्रानं घेतली थोरल्या पवारांची भेट, विधानसभेला तुतारी हाती घेणार?
Vidhan Sabha Election: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुंबई : विधानसभा निवडणुका (Vidhan Sabha Election) जवळ आल्यानं सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या हालचालींना वेग दिला आहे. राजकीय नेत्यांच्या भेटीगाठीही सुरू झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप नेते मधुकर पिचड (Madhukar Pichad) आणि वैभव पिचड (Vaibhav Pichad) हे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीसाठी गेल्याची माहिती मिळत आहे. दोघेही पिता-पुत्र पुन्हा घरवापसी करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. सिल्वर ओक निवासस्थानी शरद पवार यांच्यासोबत पिचड कुटुंबाची अर्धा तास चर्चा झाल्याचं समजत आहे. सध्या पिचड कुटुंबीय भाजपमध्ये आहे. पण, महायुतीत अकोले विधानसभेची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटत असल्यामुळे पिचड कुटुंबीय शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हातात घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये अकोले विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.
मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी शरद पवार यांची यापूर्वी अनेकदा भेट घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 2019 मध्ये मधुकर पिचड आणि त्यांचे माजी आमदार वैभव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र विधानसभा निवडणुकीत वैभवचा पराभव झाला आणि राष्ट्रवादीचे किरण लहामटे विजयी झाले.
मधुकर पिचड घरवापसी करण्याच्या तयारीत
मधुकर पिचड हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत. 2019 मध्ये किरण लहामटे यांनी वैभव पिचड यांचा पराभव केला. त्यांना अकोले विधानसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पिचड कुटुंबीयांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात परतण्याचा निर्णय घेतला आहे. मधुकर पिचड आणि वैभव पिचड राष्ट्रवादी-सपामध्ये गेल्यास अहमदनगर जिल्ह्याचे राजकीय समीकरण बदलू शकते. भाजपसाठी हा मोठा धक्का असू शकतो.