Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात तिसरी आघाडी? आज महत्त्वाची बैठक, कोणकोणत्या पक्षांचा या आघाडीत समावेश?
Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीत आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी छोटे राजकीय पक्ष देखील एकत्रित येत राज्यात तिसरी आघाडी निर्माण करणार असल्याची चिन्ह दिसत आहे.
पुणे: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी जबरदस्त तयारी सुरू केली आहे. निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर होण्याआधी पक्षांकडून मोठी तयारी सुरू केल्याचं चित्र आहे. पक्षांच्या बैठका, जागावाटप, सभा, गाठीभेटी यांना वेग आला आहे. असं असतानाच आता राज्यात छोट्या पक्षांनी एकत्रित येत तिसऱ्या आघाडीसाठीच्या हालचाली सुरू केल्याचं चित्र दिसून येत आहे. आज याबाबची महत्त्वाची बैठक देखील पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीवेळी बदलेलं चित्र आणि बसलेला मोठा फटका पाहता राजकीय पक्षांनी मोठी तयारी केली असतानाच आता विधानसभा निवडणुकीत आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी छोटे राजकीय पक्ष देखील एकत्रित येत राज्यात तिसरी आघाडी निर्माण करणार असल्याची चिन्ह दिसत आहे. ही तिसरी आघाडी निर्माण करण्यासाठी आज बैठक होत आहे.(Maharashtra Politics)
तिसऱ्या आघाडीत कोणत्या पक्षांचा समावेश?
आज पुण्यात पार पडणाऱ्या तिसऱ्या आघाडीची महत्वाची बैठकीमध्ये स्वराज्य पक्षाचे छत्रपती संभाजीराजे, प्रहार पक्षाचे बच्चू कडू, डॅा.बाबासाहेब आंबेडकारांचे पंतु राजरत्न आंबेडकर आणि इतर घटक पक्ष सहभागी होणार असल्याची माहिती आहे. राज्यामध्ये आगामी विधानसभा निवडणूकींच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीराजे यांचा स्वराज्य पक्ष, बच्चू कडू (Bachchu Kadu) यांचा प्रहार पक्ष, राजरत्न आंबेडकर व माजी सैनिक, शेतकरी घटकपक्षांना एकत्रित घेवून आज बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे.
पुणे शहरातील स्वराज्य पक्षाच्या 'स्वराज्य भवन' येथील कार्यालयात दुपारी या बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. यापूर्वी स्वराज्य पक्ष प्रमुख संभाजीराजे, प्रहार पक्ष प्रमुख बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या पुणे, मुंबई येथे दोन तीन बैठका देखील झाल्या आहेत. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पंतु देखील यात सहभागी होत आहेत. 12.30 वाजता माध्यमांशी संवाद साधून बैठकीची सुरुवात होणार आहे. तसेच बैठक संपन्न झाल्यानंतर एकत्रित पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे.त्यामुळे आता राज्यात तिसरी आघाडी स्थापन होण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.