Maharashtra Political Crisis : घटनापीठाने झापल्यानंतर भगतसिंह कोश्यारी यांची पहिली प्रतिक्रिया
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमू्र्तींच्या घटनापीठाने आपला निकाल दिला. याचवेळी घटनापीठाने तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. त्यावर आता कोश्यारी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Bhagat Singh Koshyari : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज (11 मे) सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमू्र्तींच्या घटनापीठाने आपला निकाल दिला. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावेत असं सांगत घटनापीठाने एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा दिला. याचवेळी घटनापीठाने तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. त्यावर आता भगतसिंह कोश्यारी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "घटनेच्या नियमांच्या आधारे तेव्हा मी जे काही निर्णय घेतले ते विचारपूर्वक घेतले होते. आता जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आलेला आहे त्यावर अॅनालिसिस करणं हे विधीज्ञांचे काम आहे, हे माझं काम नाही," असं कोश्यारी म्हणाले.
सरकारवर शंका घेण्याचं कारण राज्यपालांकडे नव्हतं. सरकारच्या स्थिरतेला धोका होता हे राज्यपालांना दिलेल्या पत्रातून स्पष्ट होत नव्हतं. बहुमत चाचणी बोलावण्याची गरज नव्हती. राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलावून पक्षांतर्गत फुटीचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, जे पूर्णपणे गैर आहे, असं घटनापीठाने निकालाचं वाचन करताना म्हटलं.
'विचारपूर्वकच निर्णय घेतले होते'
यावर विचारलं असता महाराष्ट्राची माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, "मी राज्यपालपदाहून तीन महिन्यांपूर्वी मुक्त झालो आहे. मी राजकीय मुद्द्यांपासून स्वतःला दूर ठेवत आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज निर्णय दिला आहे, त्यावर विधीज्ञच प्रतिक्रिया देतील. मी कायद्याचा अभ्यासक नाही. मात्र घटनेच्या नियमांच्या आधारे तेव्हा मी जे काही निर्णय घेतले ते विचारपूर्वक घेतले होते. जर त्यावेळेस माझ्याकडे कोणाचा राजीनामा आला, तर मी काय म्हणायचं की राजीनामा देऊ नये."
ते माझं काम नाही : कोश्यारी
"आता जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे त्यावर अॅनालिसिस करणं हे विधीज्ञांचं काम आहे, हे माझे काम नाही," असंही भगतसिंह कोश्यारी म्हणाले.
राज्यपालांनी राजकारण करणं चुकीचं
राज्यात सुरु असलेल्या राजकीय गोंधळात, राजकीय परिस्थितीत राज्यपालांनी भूमिका बजावणं चुकीचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. पक्षांतर्गत वादात राज्यपालांना भूमिका बजावण्याचा अधिकार नाही, तशी तरतूद घटनेत नाही. राज्यपालांनी दिलेल्या कोणत्याही संप्रेषणात असंतुष्ट आमदारांना सरकारला पाठिंबा काढून घ्यायचा होता असे सूचित करण्यात आलं नव्हतं. ठाकरे यांनी बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा गमावला आहे असा निष्कर्ष काढण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांच्या गटाच्या ठरावावर अवलंबून राहण्यात राज्यपालांनी चूक केली.
VIDEO : Bhagat Singh Koshyari : कोर्टानं झापलं, कोश्यारींची पहिली प्रतिक्रिया