राजकारणाचा स्तर घसरला! शकुनी मामा, वेडा झालेला प्राणी, कीडा म्हणत शिरसाटांची राऊतांवर टीका
Sanjay Shirsat On Sanjay Raut : सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर बेछूटपणे आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे.
Sanjay Shirsat On Sanjay Raut : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण वेगवेगळ्या कारणांनी सतत तापताना पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर बेछूटपणे आरोप-प्रत्यारोप देखील करण्यात येत आहे. पण टीका करताना नेत्यांची पातळी घसरत असून, यामुळे राजकारणाचा स्तर घसरत चालला असल्याचे दिसून येत आहे. याचं आणखी एक कारण म्हणजे शिंदे गटाचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका करताना त्यांचा उल्लेख अक्षरशः शकुनी मामा, वेडा झालेला प्राणी, कीडा असा केला आहे. त्यामुळे या नेत्यांना आता कोण आवरणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काय म्हणाले संजय शिरसाट?
मुंबईमध्ये माध्यमांना प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. "शरद पवार यांचे वक्तव्य विचारपूर्वक केलेलं वक्तव्य असून, ते संजय राऊत यांच्याप्रमाणे वक्तव्य करत नाही. महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल नसून, त्यांच्यात बिनसलेलं आहे. तर याला शकुनी मामाच्या भूमिकेत संजय राऊत नावाचा वेडा झालेला प्राणी याला खतपाणी घालत आहे. शरद पवारांच घर असो की, उद्धव ठाकरेंचं घर असो कुठेही शांतता नांदायला नको म्हणून राऊत यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे राजकारणातून असे कीडे बाजूला होत नाही तोपर्यंत योग्य दिशा मिळणार नसल्याचं संजय शिरसाट म्हणाले.
शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया...
आगामी काळातील निवडणुकीत महाविकास आघाडीची युती होईल का? हे आत्ताचा सांगता येणार नसल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी अमरावतीत केले आहे. त्यांच्या याच वक्तव्यावर शिरसाट यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी शिरसाट म्हणाले की, "शरद पवार यांनी जे काही वक्तव्य केलं आहे ते अतिशय विचारपूर्वक केलेलं वक्तव्य आहे. शरद पवार राष्ट्रीय नेते असून, त्यांनी जाणीवपूर्वक हे वक्तव्य केले आहे. त्यांना माहित आहे की, काँग्रेस त्यांच्याबरोबर नाही. राष्ट्रवादी पक्षात देखील काही आलबेल नाही. तसेच उद्धव ठाकरेंच्या गटात कोण कुणाला विचारत नसल्याची वस्तुस्थिती आहे. मग उद्या जर निवडणुकीला सामोरे जायचं असल्यास हे तीनही पक्ष एकत्र येणं शक्य नाही हे शरद पवारांना कळाले आहे. त्यामुळे त्यांनी मोठ आणि सूचक वक्तव्य केलं."
इतर महत्वाच्या बातम्या:
Sharad Pawar : 2024 मध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वबळावर? शरद पवारांचं मोठं वक्तव्य