Maharashtra Monsoon Session 2025 : आमदारांकडूनच सुरक्षेची पायमल्ली, पोलिसांनी विधानसभा अध्यक्षांना पाठवला अहवाल; नेमकं प्रकरण काय?
Maharashtra Monsoon Session 2025 : पावसाळी अधिवेशनात विधानसभा सदस्य आमदार नियम पाळत नसल्याबाबतचा अहवाल पोलिसांकडून विधानसभा अध्यक्षांना देण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे.

Maharashtra Monsoon Session 2025 : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Monsoon Session 2025) दरम्यान विधानसभा सदस्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याबाबत विधानसभा सुरक्षेतील पोलिसांनी (Police) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना एक अहवाल सादर केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. या अहवालात असे उघड झाले आहे की, अनेक आमदार सभागृहात प्रवेश करण्यापूर्वी लॉबीत त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रवेश देतात आणि कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या व फोटो सेशन करतात. ही घटना केवळ एका पक्षापुरती मर्यादित नसून, ती सर्वच पक्षांच्या आमदारांकडून घडत असल्याचे समोर आले आहे.
विधिमंडळाच्या विधानसभेतील सदस्य हाऊसमध्ये जाण्यापूर्वी लॉबीत आपल्या कार्यकर्त्यांनाही प्रवेश देतात. लॉबीत अनेक आमदार कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या आणि फोटो सेशनही करतात. हे प्रकार काही ठराविक नाही तर सर्वच पक्षातील आमदारांकडून होत असून सुरक्षा रक्षकांनी रोखल्यास थातूरमातूर कारणं दिले जातात. विधानभवनाच्या लॉबीत नियमानुसार आमदारांसोबत असलेल्या शासकीय स्वीय सहाय्यकालाच जाण्यास परवानगी असते. मात्र आमदार या नियमांची पायमल्ली करत आहेत, असा अहवाल विधानसभा सुरक्षेस असलेल्या पोलिसांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे.
विधानभवनात पास नसतानाही दिली जाते एन्ट्री
विधानसभा अध्यक्षांनी याबाबत सर्व सदस्यांना सूचना देण्यात यावी, असे देखील अहवालात म्हटले आहे. तसेच अनेक आमदार आपल्या गाडीतून विधानभवनात पास नसताना एन्ट्री देत असल्याचे देखील समोर आले आहे. आमदारांची सुरक्षा लक्षात घेता याबाबत वेळोवेळी सूचना करून देखील आमदार ऐकत नसल्यानेच याबाबतचा अहवाल विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
विधानसभा अध्यक्षांच्या सूचना
दरम्यान, याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंत्रालय सुरक्षा पोलिसांना ओळखपत्र पाहिल्याशिवाय कुणालाही विधानभवनात न सोडण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तर विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही ठिकाणी आणि सदस्य लॉबीतही फक्त स्वीय सहाय्यकांना ओळखपत्र तपासूनच सोडण्यात यावे, असा सूचना विधानसभा अध्यक्षांनी दिल्याची माहिती समोर येत आहे. आता विधानसभा अध्यक्षांच्या सुचनेनंतर विदिमंडळातील हा प्रकार थांबणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























