Maharashtra Congress : काँग्रेस हायकमांडकडून विजय वडेट्टीवार, सतेज पाटलांना नोटीस, नेमकं कारण काय?
Maharashtra Congress : जन सुरक्षा विधेयकाला विरोध का केला नाही? याचा अहवाल सादर करण्याची नोटीस हायकमांडने महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना पाठवल्याची माहिती समोर येत आहे.

Maharashtra Congress : विधानसभेत काही दिवसांपूर्वी जनसुरक्षा विधेयक (Jan Suraksha Bill) मंजूर करण्यात आले. मात्र या विधेयकावरून मोठा गदारोळ झाल्याचे दिसून आले होते. आता काँग्रेसमध्ये (Congress) यावरून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. हे विधेयक मांडताना ज्या प्रकारे काँग्रेसने विरोध करणे अपेक्षित होते त्या प्रकारे विरोध करण्यात आला नाही. त्यामुळे काँग्रेस हायकमांकडून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar), सतेज पाटील (Satej Patil) आणि अमीन पटेल यांच्याकडे अहवाल मागवल्याची माहिती समोर येत आहे. जन सुरक्षा विधेयकाला विरोध का केला नाही? याचा अहवाल सादर करावा, अशी नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान याबाबत बोलताना विजय वडेट्टीवार आणि सतेज पाटील यांनी आम्हाला कुठलीही नोटीस आलेली नाही, असे म्हटले आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, हायकमांडची कुठलीही नोटीस मला आलेली नाही. बँकेची निवडणूक होती त्यामुळे विधेयकाला मी उपस्थित नव्हतो. सभागृहात काँग्रेसचे नेते होते त्यांनी योग्य बाजू मांडली. त्यांनी केलेले भाषण आम्ही हाय कमांड कडे पाठवणार आहोत. प्रदेशाध्यक्षांना सुद्धा देणार आहोत. खरे तर त्या दिवशी वॉक आउट करणं गरजेचं होतं. तोंड दाबण्याचे काम सरकार करत आहे. प्रदेशाध्यक्षांनी एक नोट मला दिली होती. बाकी आमदारांकडे सुद्धा ती नोट होती. पण, सभागृहामध्ये हे बिल आले तेव्हा सरकारने सांगितले की, समितीमध्ये चर्चा झाली आहे. तिथे फार चर्चा करता येणार नाही.
आम्ही स्ट्रॉन्गली विरोध करायला हवा होता : विजय वडेट्टीवार
12 हजार आक्षेप या बिलासंदर्भात आले होते. आमदारांनी सुद्धा काही सूचना यामध्ये केल्या होत्या. प्रदेशाध्यक्षांकडे कोण काय सभागृहात बोलले? याचा अहवाल मी देणार आहे. हाय कमांडकडून कुठलीही नोटीस आली नाही. मी सभागृहात असतो तर मी सभागृहातच बिल फाडून टाकलं असतं. प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं होतं की, या बिलाला विरोध कसा करायचा आणि अशा प्रकारची नोट दिली होती. आम्ही स्ट्रॉन्गली विरोध करायला हवा होता. कारण तो मेसेज तसा या विधेयकाच्या विरोधात गेला असता. पण ते झालं नाही. महाविकास आघाडीमध्ये समन्वय साधणे यावेळी गरजेचं होतं. मात्र त्यावेळी ते झालं नाही हे खरं आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
जनसुरक्षा विधेयक अचानक सभागृहात आलं : सतेज पाटील
तर सतेज पाटील म्हणाले की, जन सुरक्षा विधेयकाच्या वेळी आम्ही सभागृहात होतो. विजय वड्डेटीवार यांच्याशी माझं बोलणं होईल. आता माझं त्यांच्याशी बोलणं झालं नाही. जनसुरक्षा विधेयक अचानक सभागृहात आलं. त्यामुळे ते उपस्थित नसतील. जनसुरक्षा विधेयकाबाबत आम्ही नेमकी काय बाजू मांडली? हे आम्ही पक्षश्रेष्ठींना कळवू. समितीमध्ये सुद्धा सूचना दिल्या होत्या. आम्ही जी काय माहिती आहे ती पक्षाला कळवू, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा


















