(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Monsoon Assembly Session आता सांगा खरे मुख्यमंत्री कोण आहेत? : आदित्य ठाकरे
Maharashtra Monsoon Assembly Session : "हे गद्दार सरकार आहे, ते कोसळणार म्हणजे कोसळणारच," अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली. राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशानाला आजपासून सुरुवात झाली. त्यावेळी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर निषेध करताना आदित्य ठाकरे बोलत होते.
Maharashtra Monsoon Assembly Session : "हे गद्दार सरकार आहे, ते कोसळणार म्हणजे कोसळणारच," अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी दिली. सोबतच आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "हे डरपोकांचं विधान आहे. मुख्यमंत्री आणि खऱ्या मुख्यमंत्र्यांचा काही अंकुश राहिलेला नाही. आता तुम्ही मला सांगा खरे मुख्यमंत्री कोण आहेत?" राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशानाला (Maharashtra Monsoon Assembly Session) आजपासून सुरुवात झाली. त्यावेळी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर निषेध करताना आदित्य ठाकरे बोलत होते.
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशन कसं असेल याची झलक सुरुवातीलाच पाहायला मिळाली. विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून ईडी सरकार हाय हाय, स्थगिती सरकार हाय हाय अशा घोषणाबाजी करत शिंदे-फडणवीस सरकारचा जोरदार निषेध केला.
'हे गद्दार सरकार, कोसळणार म्हणजे कोसळणारच'
यावेळी आदित्य ठाकरे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, "आम्ही लोकशाहीचा खून करणाऱ्यांच्याविरोधात उभे आहोत. हे गद्दार सरकार आहे, ते कोसळणार म्हणजे कोसळणारच. हे घटनाबाह्य सरकार आहे, बेकायदेशीर सरकार आहे, बेईमानांचं सरकार आहे.
'अपक्ष, महिला, मुंबईकरांना मंत्रिमंडळात स्थान नाही'
मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाविषयी आदित्य ठाकरे म्हणाले की, "या परिस्थिती शेतकरी, महिला यांच्या आवाजाचा कोणीच विचार करत नाही. स्वत:ला काय मिळालं, मिळालं नाही याचा विचार करत आहे. पण एक नक्की आहे. जे आमच्यात मंत्री होते तेच तिकडे जाऊन मंत्री झाले आहेत. डाऊनरेट झाले आहेत. जे त्यांचे निष्ठावंत होते, जो पहिला गट गेला त्यांना काहीच मिळालेलं नाही. म्हणजे या गद्दारांनी पुन्हा एकदा दाखवलं आहे की निष्ठेला स्थान नाही, अपक्षांना स्थान नाही, महिलांना स्थान नाही आणि मुंबईकरांना स्थान नाही. ज्या लोकांची निष्ठा एका माणसासोबत राहिली नाही, एका पक्षासोबत राहिली नाही, ते अशा लोकांसोबत कसे राहतील त्यांना तिथे जाऊन काहीच मिळालेलं नाही."
आता तुम्ही मला सांगा खरे मुख्यमंत्री कोण आहेत?
आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वक्तव्यावरुन वाद होत होत आहे, त्यांनी चिथावणीखोर वक्तव्ये केली. त्याविषयी आदित्य ठाकरे म्हणाले की, "हे डरपोकांचं विधान आहे. मुख्यमंत्री आणि खऱ्या मुख्यमंत्र्यांचा काही अंकुश राहिला आहे, असं मला वाटत नाही. म्हणून अशी गुंडगिरीची भाषा आपल्या महाराष्ट्रात होत आहे. आता तुम्ही मला सांगा खरे मुख्यमंत्री कोण आहेत? गुंडगिरीची भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीत राजकारणात कधीच नव्हती. ज्या नव्या पक्षात ते जाऊ इच्छितात त्यांना हे मान्य आहे का? मी त्यांचा राजीनामा मागणार नाही. त्यांना त्यांची जागा जनताच दाखवेल. महाराष्ट्रात गुंडांना स्थान नाही. जनतेला धमकावणारे आमदार असे मोकाट फिरत असतील तर पुढे आपल्या राज्यात कायदा सुव्यवस्थेचे काय हाल होणार आहेत. यावरुन आपल्याला अंदाज येईल."
हे गद्दार सरकार, कोसळणार म्हणजे कोसळणारच : आदित्य ठाकरे