मोठी बातमी : प्रकाश आंबेडकरांचं एका बाबतीत समाधान, संजय राऊतांचा दावा, वंचितने ठेवलेला प्रस्ताव मविआच्या अडचणीचा ठरणार?
Sanjay Raut : राज्यातून आणि केंद्रातून मोदींना सत्तेतून बाहेर काढण्यासाठी वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीसोबत असेल असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.
मुंबई: महायुतीमध्ये कोणताही मतभेद नाही, वंचितचे आमच्यासोबत यावं आणि एकत्रित निवडणूक लढवावी अशीच तीनही पक्षांची भूमिका असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. तसेच प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) वंचित बहुजन आघाडीने जागावाटपासंदर्भात प्रस्ताव दिला आहे, त्यावर सविस्तर चर्चा झाली आहे असंही ते म्हणाले. मात्र प्रकाश आंबेडकरांनी नेमका प्रस्ताव काय ठेवला याची माहिती मात्र संजय राऊतांनी दिली नाही. महायुतीच्या जागावाटपासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला.
मतदारसंघांची अदलाबदली करावी, पवार-ठाकरेंची भूमिका
महाविकास आघाडीची पुन्हा 9 मार्चला वंचितसह बैठक होणार आहे. त्या बैठकीत अंतिम जागा कोणत्या, किती जागा द्यायच्या याचा निर्णय होईल. आज प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास 17 जागांवरील मतदारसंघांवर चर्चा केली. आंबेडकरांनी काही जागांवर अदालबदली करावी अशी भूमिका शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी घेतली अशी माहिती आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
आज महाविकास आघाडीची बैठक झाली. चार पक्षांमध्ये उत्तम चर्चा झाली, 48 जागांवर चर्चा झाली, ही चर्चा सकारात्मक झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, एकाही जागेवर मतभेद नाहीत. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीसोबतही चर्चा झाली. त्यांनी एक प्रस्ताव दिलेला आहे, त्यावरही चर्चा झाली. आमची सर्वांची इच्छा आहे, प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी आमच्या सोबत असावी. आम्ही सर्वांनी एकत्र निवडणुकीला सामोरं जावं हे ठरलेलं आहे.
आजच्या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. जागावाटपाबाबत आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. कोण किती जागा लढणार याबाबतची घोषणा एकत्रच केली जाईल, स्वतंत्र घोषणा होणार नाही. प्रकाश आंबेडकरांचं एका बाबतीत पूर्ण समाधान आहे, ते म्हणजे या देशातून आणि राज्यातून मोदींची हुकूमशाही उखडून टाकायची आहे.
पुढच्या निवडणुकीत ठरणार, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
राज्यातील जागावाटपासंदर्भात आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. त्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरही उपस्थित होते. बैठकीत नेमकं काय ठरलं असा प्रश्न विचारला असता प्रकाश आंबेडकर यांनी पुढच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याचं सांगितलं. माझ्या चेहऱ्याकडे पाहून काय वाटतंय असाही प्रश्न त्यांनी माध्यमांना विचारला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या बैठकीत समाधानकारक चर्चा झाल्याचं दिसून येतंय.
ही बातमी वाचा :