(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या चर्चांना तूर्तास ब्रेक, पाच राज्यांच्या निवडणुकांनंतरच अंतिम फॉर्म्युला ठरणार
महाराष्ट्रातील काँग्रेसच्या बड्या नेत्यांना सध्या केवळ पाच राज्यांच्या निवडणुकांकरता देण्यात आलेल्या जबाबदारीवर फोकस करण्याचे आदेश आहेत.
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांचा (Loksabha Election 2024) कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. मात्र महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झालेली पाहायला मिळते. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतरच (Assembly Election 2023) महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला ठरणार आहे. जागा वाटपासंदर्भात सुरू असलेल्या प्राथमिक चर्चा पुढे ढकलण्याकडे काँग्रेसचा कल असल्याची माहिती मिळत आहे.
पाच राज्यांच्या निवडणुकांकरता महाराष्ट्र काँग्रेसमधील महत्वाच्या नेत्यांना पक्षश्रेष्ठींकडून प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आलीय. यात पाच राज्यांच्या निवडणुकांकरता अशोक चव्हाण, चंद्रकांत हंडोरे, अतुल लोंढे , माणिकराव ठाकरे,नसिम खान यांच्याकडे प्रभारीपदाच्या तर नाना पटोले, विजय वड्डेटीवार, पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे प्रचाराची जबाबदारी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेसच्या बड्या नेत्यांना सध्या केवळ पाच राज्यांच्या निवडणुकांकरता देण्यात आलेल्या जबाबदारीवर फोकस करण्याचे आदेश आहेत.
तीन पक्षांमध्ये जागा वाटपाचा तिढा
मोदी सरकारच्या विरोधात आता देशभरात विरोधक एकवाटायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सगळ्यांचाच लक्ष लोकसभा निवडणुकांवरती पाहायला मिळत आहे. लोकसभेच्या निवडणुकांच्या दृष्टीने महाराष्ट्र हे महत्त्वाच राज्य असणार आहे. मात्र यावेळीच्या लोकसभा निवडणुकांच्या जागा वाटपाचा तिढा मोठा निर्माण होणार आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी आणि काँग्रेसआघाडीमध्ये या निवडणुका लढल्या गेल्या होत्या. मात्र आता महाविकास आघाडी तयार झालेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट या तीन पक्षांमध्ये जागा वाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. 2019 च्या जागा वाटपाचा फॉर्म्युला काँग्रेसला मान्य नाही. नवीन फॉर्म्युला तयार करण्याचा आग्रह काँग्रेसचा असल्याचा पाहायला मिळतोय.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट या तीन्ही प्रमुख पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत लढवलेल्या 22 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत तयारीला सुरुवात केली. तर शिवसेना ठाकरे गटाने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या 19 जागांवर लक्ष केंद्रित करून या जागा पुन्हा जिंकण्याचा दावा केलाय. काँग्रेसने सुद्धा अशाच मतदारसंघाचा आढावा सुरू केलाय. आता आढावा घेतल्यानंतर महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेत्यांची समन्वय समिती लोकसभा निवडणुकीसंदर्भातील जागा वाटपाचा निर्णय घेणार आहेत
प्रत्येक पक्ष अधिकाधिक जागा मिळवण्याचा प्रयत्न करणार?
मात्र लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा निर्णय घेताना हे जागावाटप ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. लोकसभेच्या 48 जागांचा वाटप समसमान 16-16-16 केले जाणार, की मोठा भाऊ छोटा भाऊ म्हणत जागावाटपाचा फॉर्मुला ठरवताना प्रत्येक पक्ष अधिकाधिक जागा मिळवण्याचा प्रयत्न करणार? जागावाटपांमध्ये महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षाच्या मित्र पक्षांना अशाप्रकारे जागा दिल्या जाणार ? लोकसभेच्या 48 जागांचा वाटप समसमान 16-16-16 केले जाणार, की मोठा भाऊ छोटा भाऊ म्हणत जागावाटपाचा फॉर्मुला ठरवताना प्रत्येक पक्ष अधिकाधिक जागा मिळवण्याचा प्रयत्न करणार? जागावाटपांमध्ये महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षाच्या मित्र पक्षांना अशाप्रकारे जागा दिल्या जाणार ? असे अनेक सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
जागा वाटपाचा कोड नेमकं कसं सोडवणार?
त्यामुळे जागावाटपात डोकेदुखी ठरणारे मुद्दे महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेत्यांची समन्वय समिती समजून घेऊन जागा वाटपाचा फॉर्मुला कसा ठरवणार? आणि ठरवलेल्या फॉर्मुलावर मविआचे तीन मोठे पक्ष आणि मित्र पक्ष समाधानी होणार का ? हे आता जागा वाटपाचा कोड नेमकं कसं सोडवला जात यावरूनच दिसून येईल