(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी कोण कोण रिंगणात? 8 जागांचं चित्र स्पष्ट, तीन जागांचा सस्पेन्स कायम, जाणून घ्या यादी
Vidhanparishad Election : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या अकरा जागा 27 जुलै रोजी रिक्त होत आहेत. या जागा विधानसभा सदस्यांमधून निवडल्या जाणार आहेत.
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad Election) 11 जागा 27 जुलै रोजी रिक्त होणार आहेत. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आज संपणार आहे. विधानसभेतील संख्याबळाच्या आधारे भाजपचे 5, एकनाथ शिंदेंची शिवसेना 2, काँग्रेस 1, महाविकास आघाडीची आणखी एक जागा निवडून येऊ शकते. तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2 उमेदवार दिले जाणार आहेत. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी किती अर्ज दाखल होतात यावर निवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक लागणार हे पाहावं लागेल. भाजप, शिवसेना आणि काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यात आली आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
भाजपनं कुणाला दिली संधी?
भाजपनं लोकसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणं यश मिळवण्यात अपयश आल्यानंतर उमेदवारी जाहीर करताना तीन उमेदवार ओबीसी, एक अनुसूचित जाती प्रवर्ग आणि एक मराठा समाजातून दिला आहे.पकंजा मुंडे, योगेश टिळेकर आणि डॉ. परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून लोकसभेला ज्यांची उमेदवारी कापण्यात आली अशा माजी खासदार भावना गवळी आणि माजी खासदार कृपाल तुमाने यांना संधी देण्यात आली आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राजेश विटेकर आणि शिवाजीराव गरजे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
काँग्रेसनं देखील त्यांच्या एका जागेवर प्रज्ञा सातव यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक पार पडणार हे आज स्पष्ट होईल. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून अधिकचा एक उमेदवार देण्याची कुठल्याही प्रकारची हालचाल पाहिला मिळालेली नाही. त्यामुळे आज नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
विधानपरिषदेचे उमेदवार
भाजपचे उमेदवार :
1. पंकजा मुंडे
2. योगेश टिळेकर
3.डॉ. परिणय फुके
4. सदाभाऊ खोत
5. अमित गोरखे
शिवसेना :
1. भावना गवळी
2. कृपाल तुमाणे
राष्ट्रवादी काँग्रेस (चर्चेतील नावं)
1. राजेश विटेकर
2. शिवाजीराव गरजे
काँग्रेस :
1. प्रज्ञा सातव
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा
1. जयंत पाटील (शेकाप)
संबंधित बातम्या :
शिंदे गटाकडून विधानपरिषदेसाठी भावना गवळी आणि कृपाल तुमाने, तिकीट कापण्यात आलेल्या माजी खासदारांना संधी