MLC Election 2024: उद्धव ठाकरेंचा एकेकाळचा राईट हँड विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात? मिलिंद नार्वेकरांच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स
Maharashtra Politics: येत्या 12 तारखेला महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होऊ घातली आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांनी 11 व्या जागेवरुन उमेदवार दिल्यास चुरस निर्माण होईल.
मुंबई: एकेकाळी उद्धव ठाकरे यांचा उजवा हात अशी ओळख असलेले आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांना ठाकरे गटाकडून विधानपरिषदेच्या 11 व्या जागेवरुन निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आल्याची चर्चा काल रंगली होती. मात्र, काहीवेळातच मिलिंद नार्वेकर हे अर्ज भरणार नसल्याची बातमीही ठाकरेंच्या गोटातून (Uddhav Thackeray Camp) समोर आली. त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांच्या विधानपरिषदेच्या (Vidhanparishad Election 2024) उमेदवारीवरुन काहीवेळ संभ्रम निर्माण झाला आहे. या जागेवरुन ठाकरे गटाकडून माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनाही संधी मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र, सोमवारी संध्याकाळी अचानक मिलिंद नार्वेकर यांचे नाव अचानक चर्चेत आले. त्यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली होती. ठाकरे गटाकडून कोणतेही अधिकृत भाष्य करण्यात न आल्याने याबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे.
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलैला निवडणूक होत आहे. विधानसभेतील सध्याच्या पक्षीय बलाबलानुसार पाच जागांवर भाजप, दोन जागांवर शिंदे गट आणि दोन जागांवर अजितदादा गट असे मिळून महायुतीचे 9 उमेदवार निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडी त्यांच्याकडील संख्याबळाच्या जोरावर दोन उमेदवार सहज निवडून आणते. मात्र, तिसऱ्या जागेवरुन मिलिंद नार्वेकर किंवा विनायक राऊत यांना रिंगणात उतरवल्यास ठाकरे गट मतांची बेगमी कशी करणार, हा प्रश्नच होता.
विधानपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवार हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे ठाकरे गट 11 व्या जागेवरुन उमेदवार रिंगणात उतरवणार का, हे बघावे लागेल. विधान परिषदेची 12 जुलैला होणारी निवडणूक होणार की बिनविरोध, हा सस्पेन्स अजूनही कायम आहे. महाविकास आघाडीने तीन जागा लढवल्यास निवडणूक चुरशीची होईल. महाविकास आघाडीत काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच शेकापचे जयंत पाटील सुद्धा आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. शरद पवार गटाने त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, ठाकरे गटाने तिसरा उमेदवार रिंगणात उतरवल्यास शरद पवार गटाला मविआचा धर्म पाळावा लागू शकतो.
मिलिंद नार्वेकरांच्या उमेदवारीबाबत संभ्रम
शिवसेना ठाकरे गट तिसरा उमेदवार देण्याच्या तयारीत, मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा, मात्र यावर अद्याप अधिकृत निर्णय झालेला नाही. शिवसेना ठाकरे गटाने विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून तिसरा उमेदवार दिल्यास विधान परिषदेची निवडणूक होणे अटळ आहे. महाविकास आघाडीचे सध्याचे संख्याबळ पाहता तिसरा उमेदवार निवडून आणण्यास पाच ते सहा मतांची गरज आहे. महायुतीकडून भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे दोन उमेदवार आणि शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
आतापर्यंत कोणत्या उमेदवारांच्या नावांची घोषणा
पंकजा मुंडे (भाजप)
परिणय फुके (भाजप)
सदाभाऊ खोत (भाजप)
अमित गोरखे (भाजप)
योगेश टिळेकर (भाजप)
भावना गवळी (शिंदे गट)
कृपाल तुमाने (शिंदे गट)
प्रज्ञा सातव (काँग्रेस)
जयंत पाटील (शेकाप)
आणखी वाचा
उद्धव ठाकरेंसाठी कायपण! मुलाखत ऐकण्यासाठी मिलिंद नार्वेकर जमिनीवर बसले