(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Governor : राज्यपाल दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर, शिवरायांबाबतच्या वक्तव्यानंतर दिल्लीत पाचारण केल्याची चर्चा
Maharashtra Governor : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यपालांना दिल्लीत पाचारण केल्याची चर्चा आहे.
Maharashtra Governor : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. राज्यपालांचा आज (24 नोव्हेंबर) आणि उद्या (25 नोव्हेंबर) दिल्ली दौरा आहे. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर भगत सिंह कोश्यारी यांना दिल्लीत पाचारण केल्याची चर्चा आहे. यावेळी राज्यपाल नेकमं कोणाला भेटणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसंच भाजपचे केंद्रीय नेतृत्त्व महाराष्ट्राच्या राज्यपालांना पदमुक्त करण्याच्या दृष्टीने काही पावलं टाकणार का अशा चर्चांना उधाण आलं आहे.
राज्यपालांच्या वक्तव्यावरुन वाद आणि राज्यपाल आंदोलनं
काही दिवसांपूर्वी औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 62 व्या दीक्षान्त समारंभ सोहळ्यात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. 'शिवाजी महाराज तर जुने युगाचे हिरो, डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. गडकरीपर्यंत नवीन युगाचे हिरो असल्याचे कोश्यारी म्हणाले होते. यानंतर राज्यभर ठिकठिकाणी त्यांच्याविरोधात आंदोलनं करण्यात आली. तसंच माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार उदयराजे भोसले यांच्यासह विविध राजकीय नेत्यांनी राज्यपालांचा विरोध केला. उदयनराजेंनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना पत्रही लिहिलं होतं.
राज्यपाल काय म्हणाले होते?
दीक्षान्त समारंभ सोहळ्यात बोलताना राज्यपाल कोश्यारी म्हणाले होते की, "आम्ही शाळेत असताना आम्हाला शिक्षक विचारत होते की, तुमचा आवडता हिरो कोण आहे. त्यामुळे कोणाला सुभाषचंद्र भोस, कोणाला महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरु आवडायचे. त्यामुळे मला असं वाटतं की, तुम्हाला जर कोणी विचारलं तुमचे आवडता हिरो कोण आहे. तर तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही. कारण तुम्हाला महाराष्ट्रातच ते सापडून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या युगाची गोष्ट आहे, मी नवीन युगाची गोष्ट सांगतोय," असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले. डॉ. आंबेडकरांपासून तर नितीन गडकरीपर्यंत तुम्हाला इथेच भेटून जातील असंही कोश्यारी यांनी म्हटलं.
राज्यपालांकडून सातत्याने महाराष्ट्राची बदनामी होत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यांनी यापूर्वीही छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला होता असा आरोप करत महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या राज्यपालांना पदावरुन मुक्त करा अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्यात आता राज्यपाल दिल्ली दौऱ्यावर गेल्याने त्यांना पदमुक्त करण्याबाबत काही निर्णय होणार का याबाबतही चर्चा रंगली आहे.