अजित पवार अन् अमित शाह यांची काल दिल्लीत भेट; आज ठाण्यात महायुतीच्या नेत्यांची बैठक
Maharashtra Assembly Election Mahayuti Seat Sharing: अजित पवारांनी अमित शाह यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
Ajit Pawar Meets Amit Shah: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल (7 ऑगस्ट) दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.
काही दिवसांआधी अमित शाह पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी देखील अजित पवारांनी त्यांची भेट घेऊन लवकरात लवकर आगामी विधानसभा निवडणुकीचं जागा वाटप व्हावं, अशी विनंती अजित पवारांनी अमित शाह यांना केली होती. यानंतर काल पुन्हा अजित पवारांनी अमित शाह यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तसेच आज रात्री उशीरा ठाण्यात महायुतीच्या नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यंदाची विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. या वर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीनं अद्याप आपला फॉर्म्युला निश्चित केलेला नाही. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी विधानसभेतही भाजपनं महायुतीतील घटक पक्षांपेक्षा जास्त जागा लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजप सर्वाधिक आमदार असलेला पक्ष आहे. भाजपकडे 105 आमदार आहेत. महायुतीत भाजपसोबत अजित पवारांची राष्ट्रवादीची काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना हे दोन पक्ष आहेत.
यंदा राज्याचं सिंहासन कुणाच्या हाती?
गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक राजकीय भूकंप झाल्याचं पाहायला मिळालं आहे. सर्वात आधी शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी, त्यानंतर सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळणं, शिंदेंनी भाजपच्या साथीनं महायुती सरकार स्थापन करुन स्वतः मुख्यमंत्रीपदी विराजमान होणं, त्यानंतर अजित पवारांच्या बंडानंतरची राष्ट्रवादीतील फूट, तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी थेट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ठोकलेला दावा. यासर्व घडामोडी राज्याच्या राजकारणाला हादरे देणाऱ्या ठरल्या. त्यामुळे ज्या मतदार राजानं हे राजकीय हादरे झेलले, तो मतदार राजा यंदा राज्याचं सिंहासन कुणाच्या हवाली करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
येत्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये निवडणूका?
शिवसेना आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत बंडाळीनंतर राज्यातील समीकरणं बदलली आहेत. पण, यंदाच्या विधानसभेत खरी लढत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यातच रंगल्याचं पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातील मागील विधानसभा निवडणुका ऑक्टोबर 2019 मध्ये झाल्या होत्या. त्यामुळे नवी विधानसभा त्यापूर्वीच अस्तित्वात येणे अपेक्षित आहे. येत्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडणूक होऊ शकतात.