Madha : माढ्यात मोहिते पाटील वेगळी भूमिका घेणार? भाजपच्या रणजित निंबाळकरांच्या विरोधात शरद पवार गटाची उमेदवारी घ्यावी; समर्थकांचा दबाव
Madha Lok Sabha Election : माढ्यामध्ये रणजित निंबाळकर आणि मोहिते पाटील यांचा वाद टोकावर पोहोचला असून भाजपने निंबाळकरांच्या बाजूने कल देत त्यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केलीय.
सोलापूर: माढा लोकसभा मतदारसंघातून (Madha Lok Sabha Election) रणजित निंबाळकर (Ranjit Nimbalkar) यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटील समर्थकांत अस्वस्थता असल्याचं दिसून येतंय. या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील हे इच्छुक होते, त्यांना डावलून निंबाळकरांना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय भाजपने घेतला. त्यामुळे मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून उमेदवारी घ्यावी अशी मागणी समर्थकांकडून करण्यात येतेय. यावर मोहिते पाटील गट आता काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भाजपने राज्यातील 20 उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये माढ्यातून रणजित निंबाळकरांना संधी देण्यात आली आहे. निंबाळकरांच्या उमेदवारीला मोहिते पाटलांचा विरोध होता. त्यामुळे आता मोहिते पाटील गट मात्र नाराज झाला आहे.
बंडखोरी करा, कार्यकर्त्यांकडून मागणी
आता माघार घेऊ नका, बंडखोरी करा अशी मागणी कार्यकर्त्यांनी धौर्यशिल मोहिते पाटलांकडे केली आहे. गेल्या काही काळापासून मोहिते पाटील आणि रणजित निंबाळकर असा संघर्ष सुरू आहे. त्यातच निंबाळकरांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता मोहिते पाटील हे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आता माघार नाही, सोशल मीडियावर वातावरण तापलं
रणजित निंबाळकरांना भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटलांनी बंडखोरी करावी, आता माघार घेऊ नये अशी भूमिका कार्यकर्त्यांनी केलीय. तशा पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या जात आहेत.
शरद पवार डाव टाकणार?
दरम्यान, माढ्यामध्ये सुरुवातीपासूनच मोहिते पाटलांनी आपल्यासोबत यावं असा काहीसा सूर शरद पवारांचा असल्याचं समजतंय. माढ्यामध्ये पवार गटाकडे उमेदवार नसल्याने त्या ठिकाणी कुणाला संधी द्यायची असा प्रश्न होता. मोहिते पाटलांची असलेली ताकद लक्षात घेता शरद पवार त्यांना संधी देऊ शकतात असंही बोललं जातंय. पण भाजप सोडून मोहिते पाटील पुन्हा राष्ट्रवादीत परत येणार का आणि भाजपची त्यावर काय प्रतिक्रिया असणार हे पाहावं लागेल.
महादेव जानकर यांचं नाव चर्चेत
दरम्यान, माढ्यामधून महादेव जानकर यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवून त्यांना पाठिंबा द्यायचा अशी व्यूहरचना शरद पवार गटाने आखली आहे अशीही चर्चा आहे. माढ्यामधील धनरग मतांचं प्रमाण लक्षात घेता शरद पवार अशी चाल खेळू शकतात. त्याचा फायदा त्यांना बारामतील लोकसभा मतदारसंघातली होऊ शकतो.
ही बातमी वाचा: