(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vijay Shivtare : अजित पवार गटाचा डोस, मुख्यमंत्र्यांची विजय शिवतारेंसोबत मिटिंग फिक्स, शिवतारे माघार घेणार का?
Ajit Pawar Vs Vijay Shivtare : विजय शिवतारे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर अजित पवार गटाने मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली असून त्यांना वेळीच आवर घालण्याची मागणी केली आहे.
पुणे : काहीही झालं तरी आपण बारामती लोकसभा निवडणूक (Baramati Lok Sabha Election) लढणारच असा निश्चय केलेले माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांना मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी बोलावलं आहे. आज दुपारी ही भेट होणार असून विजय शिवतारे आपली उमेदवारी माघारी घेणार का आपल्या मतावर ठाम राहणार हे पाहावं लागेल. विजय शिवतारे यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीचा अजित पवार गट (Ajit Pawar) नाराज असून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे त्याची तक्ररही केली आहे.
विधानसभेच्या पराभवाचा बदला आता आपण लोकसभेला घेणार असून अजित पवारांना या ठिकाणाहून पाडणार असल्याची शपथ विजय शिवतारे यांनी घेतली आहे. बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार अशी लढत होणार असं बोललं जात असताना विजय शिवतारे यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर करून सर्वांनाच धक्का दिला आहे.
विजय शिवतारे यांच्या उमेदवारीमुळे सुनेत्रा पवारांच्या समोरील अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वेळच्या निवडणुकीत 'शिवतारे आमदार कसा होतो ते बघतोच' असं म्हणत अजित पवारांनी त्यांचा पराभव केला होता. तो पराभव शिवतारे यांच्या जिव्हारी लागला असून त्याचे उट्टे या लोकसभा निवडणुकीत काढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय.
मुख्यमंत्र्यानी शिवतारेंना भेटायला बोलवलं
विजय शिवतारे यांनी आपली उमेदवारी जाहीर करून अजित पवारांवर टीका केली. त्यामुळे अजित पवार गट नाराज झाला असून त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे त्याची तक्रार केली आहे. बारामतीमध्ये डॅमेज केला तर राष्ट्रवादी कल्याणमध्ये त्याचा बदला घेईल असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांना भेटीसाठी बोलावलं आहे.
विजय शिवतारे माघार घेणार का?
काहीही झालं तरी आता आपण माघार घेणार नसल्याचं विजय शिवतारे यांनी या आधी स्पष्ट केलंय. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांची समजूत काढणार का हे पाहावं लागेल.
अजित पवारांच्या काठेवाडीत शिवतारेंचं जल्लोषात स्वागत
माजी मंत्री विजय शिवतारे हे बुधवारी बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर होते. पवारांचे श्रद्धास्थान असलेल्या कण्हेरी येथील मारुतीरायाचे विजय शिवतारे यांनी दर्शन घेतले. कण्हेरी गावातून इंदापूरकडे जात असताना अजित पवार यांचे गाव असलेल्या काटेवाडी गावात कार्यकर्त्यांनी विजय शिवतारे यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
अजित पवार गटाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. विजय शिवतारे यांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी अशी मागणी सुनील तटकरे यांनी केलीय. अजितदादांवर सातत्याने टीका करत असल्याने महायुतीत वाद निर्माण होईल असा इशारा तटकरेंनी दिला.
ही बातमी वाचा: