(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Madha Loksabha : माढ्यात निंबाळकरांना धक्के सुरुच, फलटणमधून रामराजेंच्या भगिनी मोहिते पाटलांना पाठिंबा देणार
Madha Loksabha : दरम्यान, आता रामराजे यांच्या भगिनी श्रीमंत सुभद्रा राजे नाईक निंबाळकर या धैर्यशील मोहिते पाटलांना भेटून फलटणकरांच्या वतीने पाठिंबा जाहीर करणार आहेत.
Madha Loksabha : माढा लोकसभा (Madha Loksabha) मतदारसंघातून मोहिते पाटलांनी तुतारी हातात घेतली. त्यानंतर फलटणचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) काय करणार? याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. मात्र, रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) यांचे बंधू रघुनाथ राजे निंबाळकर यांनी जाहीररित्या तुतारीचे काम करणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, आता रामराजे यांच्या भगिनी श्रीमंत सुभद्रा राजे नाईक निंबाळकर या धैर्यशील मोहिते पाटलांना भेटून फलटणकरांच्या वतीने पाठिंबा जाहीर करणार आहेत. त्यामुळे भाजप उमेदवार रणजित निंबाळकर यांना धक्क्यांवर धक्के बसत आहेत. सुभद्रा राजे नाईक निंबाळकर यांच्यासोबत फलटणचे वीस ते पंचवीस आजी आणि माजी नगरसेवक मोहिते पाटील यांना भेटायला जात आहेत. मोहिते पाटलांना भेटून पाठिंबा देण्यात येणार असल्याचे सुभद्राराजे राजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले आहे.
भाजपचे डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरु
माढात मोहिते पाटील घराणे सोडून गेल्यानंतर भाजपने उत्तम जानकर यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु केले होते. मात्र, उत्तम जानकर शेवटपर्यंत भाजपच्या गळाला लागले नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानकरांच्या मनधरणीसाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. शिवाय त्यांना आमदारकीची ऑफरही दिली होती. मात्र, शेवटी जानकर आणि मोहिते पाटील एकत्र झाले आहेत. त्यानंतर भाजपने प्रत्येक मतदारसंघात डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरु केले आहेत. महायुतीतील नेत्यांना मतभेद विसरुन कामाला लागण्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे.
शिवाजी सावंत आणि बबनदादा एकत्र येणार
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांचे कट्टर विरोधक शिवाजी सावंत एकत्र येणार आहेत. दोघे माढा तालुक्यात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. मात्र, देवेंद्र फडणवीसांनी शिवाजी सावंत यांची दिलजमाई केली आहे. त्यानंतर सावंत यांनी माढा तालुक्यातून रणजित निंबाळकरांना 1 लाख मतांचा लीड देणार असल्याचे सांगितले आहे.
रणजितसिंह मोहिते पाटील भाजपच्या प्रचार यंत्रणेतून बाहेर
मोहिते पाटील कुटुंबियांनी तुतारी हाती घेतली. मात्र, रणजितसिंह मोहिते पाटील अजूनही भाजपमध्येच आहेत. ते भाजपकडून विधानपरिषदेचे आमदार आहेत. दरम्यान, भाजपने लोकसभा निवडणुकीत त्यांच्या अघोषित बहिष्कार टाकलाय. कारण भाजपच्या प्रचार यंत्रणेतून ते सध्या बाहेरच आहेत. त्यामुळे पुढील काळात रणजितसिंह मोहिते पाटील कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
इतर महत्वाच्या बातम्या