NCP BJP : अजित पवारांनी साताऱ्याची जागा सोडून काय मिळवलं, प्रफुल पटेलांनी गुपित फोडलं, भाजप राष्ट्रवादीच्या तहाची अट समोर
Satara Lok Sabha Seat : सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपला सोडून राष्ट्रवादी काँग्रेसनं काय मिळवलं यासंदर्भात प्रफुल पटेल यांनी माहिती दिली आहे. प्रफुल पटेल यांनी एबीपी माझाला याबाबत माहिती दिली.
मुंबई : महायुतीच्या अंतिम जागावाटपावर (Mahayuti Seat Sharing) आतापर्यंत अंतिम शिक्कामोर्तब झालेलं नाही. भाजप,(BJP) शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांच्यातील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. महायुतीच्या जागावाटपात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं दावा सांगितलेली साताऱ्याची जागा भाजपला सोडण्यात आली होती. ही जागा सोडताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेचा शब्द घेण्यात आल्याची माहिती समोर आली होती. यासंदर्भात एबीपी माझानं यापूर्वी बातमी प्रसिद्ध केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसनं जागा सोडल्यानंतर भाजपकडून विद्यमान राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये साताऱ्याचा तह नेमक्या कोणत्या अटीवर झाला यासंदर्भात प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाच्या बदल्यात पियुष गोयल यांची राज्यसभेची जागा घेतल्याचं प्रफुल पटेल म्हणाले. पटेल यांनी ही माहिती देत एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब केलं आहे.
नाशिकचा तिढा कायम
प्रफुल पटेल यांनी एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब करताना साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभेची जागा घेतली असल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघांवरील दावेदारी अद्याप सोडली नसल्याचं म्हटलं आहे. नाशिकच्या लोकसभेचा दावा देखील अद्याप आम्ही सोडला नसल्याची भूमिका पटेल यांनी माडंली आहे.
अजित पवारांची राष्ट्रवादी किती जागांवर लढतेय?
महायुतीच्या जागावाटपावर आतापर्यंत अंतिम शिक्कामोर्तब झालेलं नाही. भाजपनं 25 उमेदवार जाहीर केले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं 10 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून चार उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. महायुतीत काही जागांवरुन अद्याप पेच असल्याच समोर आलं आहे. नाशिक लोकसभेसाठी तयारी करणाऱ्या छगन भुजबळ यांनी उमेदवारी जाहीर होण्यास विलंब होत असल्यानं माघार घेत असल्याची घोषणा पत्रकार परिषद घेऊन केली. यानंतरही नाशिकमधून सेनेच्या हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर झेलाली नाही. दुसरीकडे महायुतीकडून अद्याप कल्याण डोंबिवली, ठाणे, पालघर, मुंबई दक्षिण यासह इतर काही जागांवरील उमेदवार महायुतीकडून जाहीर करण्यात आलेले नाहीत.
अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेस अधिकृतपणे महाराष्ट्रात चार जागांवर निवडणूक लढवत आहे. बारामतीतून सुनेत्रा पवार, शिरुरमधून शिवाजीराव आढळराव पाटील,धाराशिवमधून अर्चना पाटील, रायगडमधून सुनील तटकरे निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील परभणीच्या जागेवर रासपचे महादेव जानकर निवडणूक लढवत आहेत.
संबंधित बातम्या :