INDIA: इंडिया आघाडीच्या कुठल्याही नेत्याच्या संपर्कात राहू नका, एकनाथ शिंदेंकडून खासदारांना सक्त ताकीद
शिवसेनेच्या वाटेला येणाऱ्या केंद्रीय मंत्री पदाच्या संदर्भात ही महत्त्वपूर्ण चर्चा झाली. बैठकीत नरेंद्र मोदी आणि एनडीएच्या सत्ता स्थापनेसंदर्भात महत्त्वाची चर्चा झाली.
मुंबई : लोकसभा निवडणुकांनंतर (Lok Sabha Election 2024) दिल्लीतील (Delhi) राजकीय घडामोडींनी वेग धरला आहे. परवा निकाल लागल्यानंतर काल (5 जून) दिल्लीत एनडीए (NDA) आणि विरोधकांच्या इंडिया आघाडीची (India Alliance) महत्त्वाची बैठक पार पडली. सर्व देशाच्या नजरा दिल्लीतील घडामोडींवर खिळल्या होत्या. एकीकडे एनडीएकडून सत्ता स्थापन करण्यासाठी वेगानं हालचाली सुरू आहे. या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या कुठल्याही नेत्याच्या संपर्कात न राहण्यासंदर्भात खासदारांना सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिल्या आहेत. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नवीन खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक झाली या बैठकीत या सूचना दिल्या आहेत.
शिवसेनेच्या वाटेला येणाऱ्या केंद्रीय मंत्री पदाच्या संदर्भात ही महत्त्वपूर्ण चर्चा झाली. बैठकीत नरेंद्र मोदी आणि एनडीएच्या सत्ता स्थापने संदर्भात महत्त्वाची चर्चा झाली. नरेंद्र मोदी यांना दिलेल्या पाठिंब्याबाबत चर्चा झाली .आज रात्री सर्व खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिल्लीला रवाना होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी आज शिवसेनेच्या निवडून आलेल्या खासदारांसाठी विशेष स्नेहभोजन आणि बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सर्व सहा खासदाराना भेटून त्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्याशी संवाद साधला.
कोणते खासदार उपस्थित होते?
यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, खासदार प्रतापराव जाधव, खासदार संदीपान भुमरे, खासदार धैर्यशील माने, खासदार रवींद्र वायकर, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार संजय मंडलिक, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, आमदार संजय शिरसाट आणि शिवसेना सचिव संजय मोरे हेदेखील उपस्थित होते.
शिंदेंच्या शिवसेनेला 2 राज्यमंत्री आणि केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता
एनडीए (NDA) आघाडी आता पुन्हा एकदा देशात सरकार स्थापन करण्यासाठी सज्ज झाली आहे. दरम्यान, एनडीएत सहभागी असलेल्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना (Eknath Shinde Shivsena) तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या (Ajit Pawar NCP) वाट्याला नेमकं काय येणार? असे विचारले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार गटाला एक केंद्रीय तर एक राज्यमंत्रिपद तर शिंदेंच्या शिवसेनेला 2 राज्यमंत्री आणि केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मंत्रिपदाच्या शर्यतीत असणाऱ्या संभाव्य नेत्यांचीही नावे आता समोर आली आहेत.
हे ही वाचा :
वंचितच्या मतांना महाविकास आघाडीचा सुरुंग; प्रकाश आंबेडकरांचं भविष्यातील राजकारण धोक्यात!