धक्कादायक! माजी मुख्यमंत्र्यांच्या कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; गाडीसमोरच कार्यकर्त्यांच्या उड्या
जगमोहन रेड्डी यांच्या स्वागतासाठी शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांच्या कारकडे धाव घेतली. हातात बॅनर आणि फुलांच्या माळा घेऊन कार्यकर्ते त्यांच्या कारच्या दिशेने धावले.

हैदराबाद : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी (Jaganmohan reddy) यांच्या स्वागतला आलेल्या गर्दीत एका 70 वर्षीय वृद्धाचा कारखाली चिरडून (Accident) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जगनमोहन रेड्डी शनिवारी सत्तेनपल्ली येथे एका कार्यक्रमासाठी आले असता, त्यांच्या स्वागताला कार्यकर्त्यांनी व चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी, त्यांच्या कारच्या ताफ्यासमोरच कार्यकर्त्यांनी धाव घेतल्याने सुरक्षा यंत्रणेला देखील ही गर्दी नियंत्रित करता आली नाही. त्यामुळे, जगमोहन रेड्डी ज्या कारमधून तिथं पोहोचले, त्याच कारच्या चाकाखाली एका 53 वर्षीय व्यक्तीचा चिरडून मृत्यू झाला आहे. चिल्ली सिंगा असं मृत व्यक्तीचे नाव असल्याची माहिती आहे.
जगमोहन रेड्डी यांच्या स्वागतासाठी शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांच्या कारकडे धाव घेतली. हातात बॅनर आणि फुलांच्या माळा घेऊन कार्यकर्ते त्यांच्या कारच्या दिशेने धावले. यावेळी, चिल्ली सिंगा हेही कारच्या दिशेने धावत असताना कारखाली आल्याने त्यांची मान कारच्या चाकाखाली दबली गेली. या दुर्घटनेत चिल्ली सिंगा यांचा जागीच मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली. आता, या घटनेवरुन विरोधी पक्षाने हल्लाबोल करायला सुरुवात केली असून राज्यात राजकारण सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, घटनास्थळी गुंटूरचे एसपी आणि मोठा पोलीस ताफा पोहोचला आहे. मात्र, माजी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील सुरक्षा यंत्रणेवर बोट ठेवलं जात आहे.
ताफ्यात केवळ तीनच वाहनांना परवानगी
आंध्र प्रदेशमधील गुंटूरचे एसपी सतीश कुमार आणि गुंटूर रेंजचे आयजी सर्वश्रेष्ठ त्रिपाठी यांनी कार अपघातातील मृताच्या घटनेला दुजोरा दिला आहे. माजी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात अशाप्रकारे कार अपघातात व्यक्तीचा मृत्यू होणे ही दुर्दैवी घटना असल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान, जगनमोहन रेड्डी यांच्या ताफ्यात जवळपास 30 ते 35 वाहने होती. मात्र, अधिकृतपणे केवळ तीन वाहनांना परवानगी असतानाही इतका मोठा फौज फाटा कशासाठी असा प्रश्न या दुर्दैवी घटनेनंतर उपस्थित होत आहे. तसेच, अतिरिक्त वाहने नेमकी कोणाची होती, रेड्डी यांच्या ताफ्यात कुठून व कशामुळे सहभागी झाली याची चौकशी होणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा
मी मुख्यमंत्री होण्याची वाट पाहू नका; देवाभाऊंचं नाव घेत नितेश राणेंचा कोळी बांधवांना सल्ला
























