Nashik : नाशिकमध्ये ट्विस्ट, क्लायमेक्सचा धडाका सुरूच, आधी हेमंत गोडसेंचा फोटा गायब, आता छगन भुजबळ प्रचारातून गायब
Nashik Lok Sabha Election : नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि नुकतेच शिंदे गटात आलेले विजय करंजकर यांच्यामध्ये सुप्त संघर्ष असल्याची चर्चा सुरू आहे.
नाशिक : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारीवरून सर्वात जास्त ट्विस्ट आणि क्लायमॅक्स कुठे आले असतील तर ते नाशिकमध्ये. उमेदवारीवरून रुसवे फुगवे झाले, आरोप प्रत्यारोप झाले आणि अखेरीस शिंदे गटाच्या हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना उमेदवारी जाहीर झाली. आता प्रचाराच्या रणधुमाळीतही नाराजीचेच पाढे सुरू आहेत का अशी चर्चा रंगलीय. कारण एकीकडे राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) प्रचारात फारसे दिसत नाहीत, तर दुसरीकडे गोडसे आणि भुजबळांच्या फोटोवरूनही नवी कुजबुज रंगल्याचं दिसतंय.
नाशिकमध्ये शिंदे गटाच्या झालेल्या मेळाव्याच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उमेदवार असलेल्या हेमंत गोडसेंचं यांचं भाषण झालं. मात्र या स्टेजवर लावलेला एक बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होता. त्याचं कारण म्हणजे ज्यांच्या प्रचारासाठी हा बॅनर लावला होता, त्या हेमंत गोडसेंचा फोटोच शोधूनही सापडत नव्हता. अगदी बारीक नजर करून पाहिलं तरी गोडसेंचा फोटो काही दिसला नाहीच.
नाशिकच्या या मेळाव्यात शिंदे गटाच्या नेत्यांनी लोकांसमोर मतांचा जोगवा मागितला आणि आरोप प्रत्यारोपांचा पाऊसही पाडला. मात्र खरी चर्चा रंगली ती हेमंत गोडसेंचा फोटो नसलेल्या बॅनरचीच. कारण हा मेळावा ज्यांनी आयोजित केला होता त्या विजय करंजकर यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र त्याआधी करंजकर आणि हेमंत गोडसे यांच्यातील वादही नाशिककरांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला आहे.
कोण आहेत विजय करंजकर?
विजय करंजकर हे ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख होते. ठाकरे गटाची उमेदवारी मिळेल या आशेनं त्यांनी प्रचाराचा धडाका लावला होता. याच प्रचारात त्यांनी शिंदे गट आणि हेमंत गोडसेंवर जोरदार हल्लाबोल केला होता. तिकीट न मिळाल्याने
करंजकरांचा नुकताच शिंदे गटात प्रवेश केला. मात्र आधीच शिंदे गटाकडून हेमंत गोडसेंना तिकीट जाहीर करण्यात आलं आहे. म्हणूनच करंजकरांनी आयोजित केलेल्या मेळाव्याच्या बॅनरवर हेमंत गोडसेंचा फोटो नसल्याने नाशिकमध्ये मोठी कुजबुज रंगली. मात्र हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर होण्याआधी बॅनर छापल्याने त्यांचा फोटो नसल्याचं सांगण्यात येतंय.
एकेकाळी एकमेकांवर आगपाखड करणारे हेमंत गोडसे आणि विजय करंजकर आता एकाच गटात आहेत. आता दोन अप्पा एकत्र असल्याने भाऊची धाकधूक वाढल्याचं हेमंत गोडसे यांनी म्हटलंय. तर आता वाघाची झेप काय असते हे दाखवून देऊ असं विजय करंजकर यांनी म्हटलंय.
एकीकडे बॅनरवर हेमंत गोडसेंचा फोटो नसल्याने संभ्रम वाढलेला असतानाच दुसरीकडे छगन भुजबळही प्रचारात फारसे दिसत नसल्यानेही नाशिककर बुचकळ्यात पडल्याचं पाहायला मिळतंय.
छगन भुजबळांच्या मनात नेमकं काय?
नाशिकमधून लढण्यासाठी छगन भुजबळ इच्छुक होते. मोदी, शाहांनी भुजबळांच्या नावाचा आग्रह धरला होता असा दावाही केला गेला. पण वेळेत उमेदवारी जाहीर न झाल्याने भुजबळांची रिंगणातून माघार घेतली. त्यानंतर नाशिकची जागा शिंदे
गटाला गेली आणि गोडसेंना तिकीट दिलं गेलं.
आता छगन भुजबळ प्रचारात फारसे दिसत नसल्याने लोकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. याबाबत छगन भुजबळ म्हटलंय की, प्रत्येक ठिकाणी जाणं शक्य होत नाही, कधी कधी तिथे पदाधिकारी असतात. तर अजित पवारांनी म्हटलंय की, छगन भुजबळांची तब्येत थोडी नरम-गरम आहे. तब्येत चांगली असल्यावर सगळ्या गोष्टी करता येतात.
एकूणच, नाशिकच्या उमेदवारीवरून गेल्या काही दिवसांत वेगवेगळे क्लायमॅक्स येत गेले आणि अखेरीस हेमंत गोडसेंना शिंदे गटाने उमेदवारी जाहीर केली. मात्र आता महायुतीत एकत्र असलेले छगन भुजबळ आणि विजय करंजकर आधी नाशिकच्या उमेदवारीवर डोळा ठेऊन होते, त्यामुळे हेमंत गोडसेंचा निवडणुकीचा पेपर कसा सोडवतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.
ही बातमी वाचा: