भाचीला न्याय द्या, पीडित आईच्या व्हायरल पत्रानंतर एकनाथ शिंदेंचा फोन, निलम गोऱ्हेंनीही घेतली कुटुंबीयांची भेट
छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून बीडच्या केएसके महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीने 14 मार्च रोजी मामाच्या गावी म्हणजेच धाराशिव येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.

बीड : जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटनांनी गेल्या काही दिवसांत राज्याचे लक्ष वेधले आहे. तर, काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील (Beed) एका शिक्षकाच्या आत्महत्येनं महाराष्ट्र हादरला होता. आता, छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून महिनाभरापूर्वी येथील एका महाविद्यालयीन तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्याग्रस्त मुलीच्या पीडित आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहून लाडक्या बहिणीची आर्जव केली होती. तसेच, आरोपींवर कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी देखील महिलेनं केली होती. त्यानंतर, आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित महिलेशी फोनवरुन संपर्क साधला. तर, आज विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे (Neelam gorhe) यांनी पीडित महिलेची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच, कठोरात कठोर कारवाईचे आश्वासनही दिले आहे.
छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून बीडच्या केएसके महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीने 14 मार्च रोजी मामाच्या गावी म्हणजेच धाराशिव येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेला महिना पूर्ण होतोय, मात्र आत्महत्या केलेल्या तरुणीचे कुटुंब अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. साक्षी कांबळे असं आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तर अभिषेक कदम असं आरोपीचे नाव आहे. 20 एप्रिल रोजी साक्षीचे लग्न ठरलं होतं. मात्र, अभिषेक कदम हा वारंवार ब्लॅकमेल करत होता. याच ब्लॅकमेलिंगला कंटाळून साक्षीने धाराशिव येथील मामाच्या घरी गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली. या घटनेला एक महिना पूर्ण होतोय तरी देखील न्याय मिळत नसल्याने साक्षीच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. पीडित आईचे, हे पत्र सोशल मीडियात चांगलच व्हायरल झालं. त्यानंतर, एकनाथ शिंदेंनी पीडित महिलेशी फोनवरुन संपर्क साधत आरोपींवर कडक कारवाईचा शब्द लाडक्या बहिणीला दिला आहे. साहेब, तुमच्या भाचीला न्याय मिळवून द्या, लाडक्या बहिणीची तुम्हाला विनंती असल्याचं मृत साक्षी कांबळे हिच्या आईने म्हटलं.
धाराशिव पोलिसांनी कसलीही सहकार्य केले नाही असा आरोप साक्षीची आई कोयना विटेकर यांनी केला. तर, याच महाविद्यालयातील आणखी दोन मुलींनी आत्महत्या केल्याचंही विटेकर यांनी म्हटलं आहे. माझ्या मुलीसोबत जे घडलं ते इतर मुलींसोबत घडू नये, त्यासाठी यातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी पीडित कुटुंबाने केली आहे. दरम्यान, धाराशिव पोलिसांनी आरोपी अभिषेक कदमला अटक केली असून त्याची जामीनावर सुटका देखील झाली आहे.
साक्षीच्या आईला एकनाथ शिंदेंचा फोन
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित कुटुंबाला फोन करुन साक्षीच्या आईचे सांत्वन केले. तसेच, धाराशिवचे प्रकरण बीडमध्ये वर्ग करण्याची ग्वाही पीडित आईला दिली. साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणात आता बीड पोलीस तपास करणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर पोलीस महानिरीक्षकांना आदेश दिला. तसेच, धाराशिव आणि बीडच्या दोन्ही एसपींनाही त्यांनी आदेश दिले आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपींची कसून चौकशी करा, जमिनीवर सुटलेल्या आरोपीबाबत वरच्या न्यायालयात दाद मागा. आरोपी अभिषेक एकनाथ कदम याचा जामीन रद्द होण्यासाठी न्यायालयात बाजू मांडा, असेही निर्देश शिंदेंनी दिले आहेत. कोणत्याही आरोपीची गय केली जाणार नाही, सर्व आरोपींना कठोर शिक्षा होईल, अशा शब्दत एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणीस दिला आहे.
आरोपीच्या पाठिशी उभं राहणाऱ्यांवरही कारवाई
साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरण; आत्महत्या प्रकरणातील आरोपीचा जामीन रद्द करण्यासाठी पोलीस अपील करणार आहेत. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच, हे प्रकरण बीडमध्ये वर्ग करण्याची कुटुंबीयांची मागणीही त्यांनी ऐकून घेतली. तसेच, या प्रकरणातील आरोपीला जामीन मिळालेला असून तो रद्द करण्यासाठी धाराशिव पोलीस न्यायालयात अपील करणार आहेत, असे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. यावेळी कुटुंबीयांनी आपल्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या. या प्रकरणात एफआयआर नोंद झाला असला तरी आता पूरक जबाब घेण्यात येईल. तसेच, अशा पद्धतीने मुलीला त्रास देणाऱ्यांच्या पाठीशी कोण उभं राहत असेल तर त्यावर देखील कारवाई केली जाईल, असे देखील नीलम गोऱ्हे यांनी म्हटले.
महाविद्यालयीन तरुणींना आवाहन
महाविद्यालयातील तसेच शाळेतील तरुणींना कोणी त्रास देत असेल तर त्याची गाठ महाराष्ट्र पोलिसांशी आहे. अशा पद्धतीने त्रास होत असेल तर तात्काळ पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन गोऱ्हे यांनी केले.
हेही वाचा
उद्धव ठाकरे हा मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह; आशिष शेलारांनी दुसऱ्या ठाकरेंशीही पंगा घेतला























