Uddhav Thackeray & Ashish Shelar: उद्धव ठाकरे हा मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह; आशिष शेलारांनी दुसऱ्या ठाकरेंशीही पंगा घेतला
अल्पसंख्यांकांना भारतात जितकं स्वातंत्र्य मिळतं तितकं कुठेच मिळत नाही. योगी आदित्यनाथ यांना लोकांनी निवडून दिलं आहे, त्यांना काय चॅलेंज देणार, आशिष शेलारांचं घणघाती भाषण

मुंबई: मुंबई शहरातील सर्व जमिनींवर होणाऱ्या लँड स्कॅमचा बादशाह हे उद्धव ठाकरे आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या डोक्यात सतत लँड आणि लँड स्कॅम असे विचार सुरु असतात. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काही नवीन बोलणे सोडून दिले आहे. ते सतत ही जमीन अदानीला दिली, ती जमीन अंबानीला दिली, असेच बोलत असतात, अशी टीका भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी केले. ते अलीकडेच मुंबईतील गरवारे क्लबमध्ये पार पडलेल्या भाजपच्या कार्यशाळेत बोलत होते. यावेळी आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. काही दिवसांपूर्वीच आशिष शेलार यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याशी असलेले वैयक्तिक मैत्रीचे संबंध पक्षीय राजकारणाच्या आड येत असतील तर 'वैयक्तिक मित्र वैगेरे विषय संपला', असे म्हटले होते. त्यानंतर आता आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांनाही अंगावर घेतले आहे.
मुंबई महानगरपालिका 25 वर्षे उद्धव ठाकरे यांच्याकडे होती. आजघडीला मुंबईतील एक चौरस फूट क्षेत्रफळाची जागा लाखोंच्या घरात आहे. पण उद्धव ठाकरे यांनी पालिकेत त्यांची सत्ता असताना बिल्डरांना 1 कोटी चौरस फूट क्षेत्र फुकटात देण्याचे काम केले. ते आम्हाला काय जाब विचारतील, असे आशिष शेलार यांनी म्हटले. यावेळी आशिष शेलार यांनी वक्फ कायद्यासंदर्भातही भाष्य केले. उद्धव ठाकरे यांच्याकडून खोटी माहिती पसरवली जात आहे. तुमची संपत्ती घेणार, मशीद घेणार, स्मशानभूमी घेणार, असे खोटे पसरवले जात आहे. या देशात कायदा आहे. तसे काहीही करता येणार नाही. वक्फ विधेयक हे गरीब मुस्लिमांच्या फायद्यासाठी आहे. नरेंद्र मोदी सरकार वक्फ बोर्डाने घेतलेल्या जमिनी पुन्हा देण्यासाठी काम करत आहे. आम्ही आयुष्यभर विरोधी पक्षात होतो, कधीच आम्ही म्हटले नाही की, संसदेचे कायदे आम्ही मानणार नाही. मुस्लिम देखील पुढे येऊन मोदींचे अभिनंदन करत आहेत. जे मुस्लिम समाजाला व्होट बँक समजतात तेच लोक याला विरोध करत आहेत. जे लोक नाटक करत आहेत त्यांची एक यादीच आम्ही प्रसिद्ध करणार आहोत. यांना आम्ही उघडे पाडणार आहोत. कायदा बनला आहे आता आम्ही नियम बनवणार. त्यानंतर गरीब मुस्लिम लोकांना कसा फायदा होणार ते बघणार, मी याला क्रांतिकारी उपलब्धी मानतो, असे आशिष शेलार यांनी म्हटले.
त्यामुळे वक्फ कायदा का आणला, हे प्रत्येक गल्लीत जाऊन सांगा. मी तुम्हाला सल्ला देतो की, तुम्ही नम्रतेने वागा. समोरचा चुकीचं बोलत असेल तरी स्वत:चं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आज तुम्हाला वाटेल की प्रतिकूल वातावरण आहे, पण काळ दाखवून देईल की, मोदीजी बरोबर होते, असेही आशिष शेलार यांनी म्हटले.
आणखी वाचा























