डॉ.बाबासाहेबांच्या स्मारकाकडे सरकारचे दुर्लक्ष, कंत्राटदारावर अंकुश नसल्यानं स्मारकाचं काम ठप्प; ठाकरे गटाची सरकारवर टीका
Indu Mill Memorial : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाकडे सरकारचे दुर्लक्ष झालं असून कंत्राटदारावर अंकुश नसल्यानं स्मारकाचं काम ठप्प पडल्याची टीका करत ठाकरे गटाने सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदु मिल येथील (Indu Mill Dr. Babasaheb Ambedkar Memorial Project) स्मारकाचं काम रखडल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena Thackeray Group) सरकारला लक्ष्य करत जोरदार टीका केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याची टीका ठाकरे गटाने केली आहे. कंत्राटदारावर अंकुश न राहिल्यामुळे स्मारकाचं काम ठप्प झाल्याचं म्हणत ठाकरे गटाने राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
कंत्राटदारावर अंकुश नसल्यानं डॉ.बाबासाहेबांच्या स्मारकाचं काम ठप्प
डॉ.बाबासाहेबांच्या स्मारकाच्या रखडलेल्या कामाकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न ठाकरे गटाने केला आहे. शिवसेना ठाकरे गटाने एक्स मीडिया म्हणजेच आधीचं ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत इंदूमिलमधील डॉ.बाबासाहेबांच्या स्मारकाच्या रखडलेल्या कामावरून शिंदे आणि भाजप सरकारवर टीका केली आहे. कोरोना महामारीच्या वेळी लॉकडाऊनमध्येही स्मारकाच्या कामात खंड पडला नव्हता, मात्र शिंदे आणि भाजप सरकारने गेल्या वर्षभरात स्मारकाच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याने स्मारकाचं काम रखडल्याची टीका ठाकरे गटाने या पोस्टमधून केली आहे.
ठाकरे गटाची सरकारवर टीका
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने एक्स मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे की, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या स्मारकाबाबत मिंधे-भाजप सरकार अक्षम्य दुर्लक्ष करत असून गेले वर्षभर ह्या स्मारकाचे काम रखडले आहे. बाबासाहेबांच्या विचारांचे प्रेरणादायी जागतिक दर्जाचे स्मारक दादरमधील इंदूमिल कपाऊंड येथे उभारण्यात येत आहे. 2018 साली स्मारकाला मंजूरी मिळाली आणि कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली. कराराप्रमाणे कंत्राटदाराने कामाला सुरुवात केली. अगदी कोरोनासारख्या कठीण काळातदेखील ह्या स्मारकाच्या कामात खंड पडू दिला नव्हता. मात्र गेले वर्षभर स्मारकाच्या कामाकडे सरकारने पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. एमएमआरडीएच्या आयुक्तांनी स्मारकाच्या कामाचा आढावा घेणारी बैठकच घेतली नाही, परिणामी कंत्राटदारावर अंकुशच राहिलेला नाही आणि स्मारकाचे काम ठप्प झालेले आहे.
भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या स्मारकाबाबत मिंधे-भाजप सरकार अक्षम्य दुर्लक्ष करत असून गेले वर्षभर ह्या स्मारकाचे काम रखडले आहे.
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) June 14, 2024
बाबासाहेबांच्या विचारांचे प्रेरणादायी जागतिक दर्जाचे स्मारक दादरमधील इंदूमिल कपाऊंड येथे उभारण्यात येत आहे. २०१८ साली… pic.twitter.com/Mvlr6BAPSv
इंदू मिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक
दादरमधील इंदू मिलमधील 4.84 हेक्टर जागेवर राज्य सरकारकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक बांधण्यात येत आहे. 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र भूमीपूजनानंतर तीन वर्षांनी म्हणजे 2018 मध्ये या स्मारकाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली.