(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dharashiv : विधानसभेची खडाजंगी : धाराशिवमध्ये 4 विधानसभा मतदारसंघ, महायुती की महाविकास आघाडी कोणाचं पारडं जड?
Dharashiv, Assembly Election : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मोठं यश मिळवलंय. त्यामुळे महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या तीनही पक्षांचा आत्मविश्वास वाढलाय.
Dharashiv, Assembly Election : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मोठं यश मिळवलंय. त्यामुळे महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या तीनही पक्षांचा आत्मविश्वास वाढलाय. शिवाय, लोकसभेला अपयश मिळाल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लोकांना खूश करण्याचा प्रयत्न केला. लाडकी बहीण योजनेमुळे आपली मतं वाढणार आहेत, असं काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षात अनेक भुकंप पाहायला मिळाले आहेत. याचा प्रत्येक जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम झालाय. धाराशिव जिल्ह्यात कोणाचं वर्चस्व आहे? 2019 ची विधानसभा निवडणूक कोण कोणत्या पक्षातून लढले? सध्याचं राजकीय गणित काय? हे जाणून घेऊयात...
धाराशिव जिल्ह्यातील आमदारांची यादी – (Dharashiv MLA List)
उमरगा – ज्ञानराज चौगुले (शिंदेंची शिवसेना)
तुळजापूर – राणा जगजितसिंह पाटील (भाजप)
धाराशिव – कैलास पाटील (ठाकरेंची शिवसेना)
परांडा – तानाजी सावंत (शिंदेंची शिवसेना)
धाराशिव जिल्ह्यातील सध्याचं राजकीय बलाबल पाहिलं तर महायुतीचे तीन आमदार आहेत. तर महाविकास आघाडीचा केवळ 1 आमदार आहे. शिवाय, तानाजी सावंत सध्या महायुती सरकारमध्ये मंत्री देखील आहेत. मात्र, 1 मंत्री आणि 3 आमदार असूनही लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना लीड मिळाला होता. तब्बल सव्वा तीन लाखांच्या लीडने ते निवडून देखील आले होते.
धाराशिव कळंब विधानसभेचं चित्र
पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाल्यानंतर धाराशिव विधानसभा मतदारंसघातील जनतेने ओमराजे निंबाळकर यांना विधानसभेवर पाठवले होते. मात्र , पुढील निवडणुकीत राणा जगजितसिंह पाटील यांनी त्यांचा त्यांचा पराभव केला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार कैलास पाटील यांनी बाजी मारली होती. ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांनी शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी देखील ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर करताना कैलास पाटील यांची देखील उमेदवारी जाहीर केली होती. दोघांची उमेदवारी जाहीर करण्याची गरजच नाही, असंही ठाकरेंनी म्हटलं होतं. ओमराजे आणि कैलास पाटील यांनी धाराशिव विधानसभा मतदारसंघात चांगला जनसंपर्क निर्माण केलाय. त्यामुळे कैलास पाटील यांच्याविरोधात तगडा उमेदवार उभा करणे महायुतीसाठी महत्वाचं असणार आहे.
उमरगा विधानसभेचं चित्र
2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना नेते ज्ञानराज चौगुले यांनी बाजी मारली होती. शिवसेनेतून निवडून आलेल्या ज्ञानराज चौगुले यांनी पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. 2019 मध्ये त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या दिलीप भालेराव यांनी फाईट दिली होती. मात्र, आता शिंदेंच्या शिवसेनेकडून विद्यमान आमदार असल्याने ज्ञानराज चौगुले यांनाच उमेदवारी मिळू शकते. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत उरमगा मतदारसंघाची जागा कोणाला सुटणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
परांडा विधानसभेत पुन्हा एकदा तानाजी सावंत विरुद्ध राहुल मोटे?
2019 च्या विधानसभा निवडणुकीत परांडा मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री तानाजी सावंत यांनी विजय मिळवला होता. तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवारांचे नातेवाईक असलेल्या राहुल मोटे यांना पराभवाची धूळ चारली होती. शिवाय गेल्या 5 वर्षात तानाजी सावंत यांनी मतदारसंघात जनसंपर्क निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी परांडा तालुक्यातील नेते ज्ञानेश्वर पाटील यांनी उद्धव ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. 2019 मध्ये ज्ञानेश्वर पाटील यांनी तानाजी सावंत यांना साथ दिली होती. मात्र, आता ज्ञानेश्वर पाटील महाविकास आघाडीसोबत आहेत. शिवाय, राहुल मोटेही यापूर्वी 3 टर्म या विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत. त्यांनीही पुन्हा एकदा कामाला लागत लोकांमध्ये राहत ताकद वाढवण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे तानाजी सावंत मंत्री असले तरी राहुल मोटे त्यांच्यासमोर आव्हान उभं करतील, असं बोलले जात आहे.
तुळजापूर विधानसभे राणा पाटीलांना उमेदवारी मिळाली तर विरोधात कोण लढणार?
2019 मध्ये शरद पवारांचे नातेवाईक असलेल्या राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राणा पाटील यांनी आपला पारंपारिक मतदारसंघ सोडत तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच निर्णय घेतला. भाजपकडून त्यांना उमेदवारीही देण्यात आली. त्यांनी काँग्रेसच्या मधुकरराव चव्हाण यांचा पराभव केला होता. दरम्यान, आता राणा पाटील यांना भाजपकडून पुन्हा एकदा तुळजापूरमधून उमेदवारी दिली जाऊ शकते. तर महाविकास आघाडीकडून कोणाला संधी देण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
विधानसभेची खडाजंगी : गोंदिया जिल्ह्यात 4 विधानसभा मतदारसंघ, आमदारांची यादी; जाणून घ्या सध्याची राजकीय स्थिती