मुख्यमंत्रीपदावर बसणाऱ्या लेकाला कौतूकानं आईची शाबासकी, म्हणाल्या, 'संयमानं परीक्षा बघितली पण दरवेळी मेरिटमध्ये'
राजकारणात कितीही बाका प्रसंग आला तरी संयमानं सामोरा जातो. असं सांगत बाहेर कितीही वाईट परिस्थिती असली तरी त्याचा परिणाम घरात तो कधीही होऊ देत नाही.
Devendra Fadanvis: महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागल्यापासून कोण मुख्यमंत्री होणार? या प्रश्नाचं उत्तर संपूर्ण राज्याला 4 डिसेंबरला मिळालं आणि विधीमंडळाच्या गटनेतेपदी एकमुखानं देवेंद्र फडणवीस यांच्या नावाच्या प्रस्तावाला संमती मिळाली. देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस असं पूर्ण नाव लावत 5 डिसेंबर रोजी आझाद मैदानात देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. दरम्यान,राज्यात मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांची घोषणा होताच कार्यकर्त्यांसह नागरिकांनी ठिकठिकाणी जल्लोष केला. पाच वर्षांनी पुन्हा मुख्यमंत्री होत असताना देवेंद्र फडणवीस यांच्या आई सरिता फडणवीस लेकाच्या कौतूकानं भावनिक झाल्या होत्या. तो नम्र आहे, संयमी तर आहेच, अनेकदा संयमानं त्याची परीक्षा घेतली पण दरवेळी तो मेरिटमध्ये आला. कोणत्याही क्षेत्रात बिनडाग राहिले पाहिजे. आपल्या चारित्र्यावर कोणी शंका घेता कामा नये हा संस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्या वडिलांकडून देवेंद्रला मिळाला असल्याचं सांगत मुख्यमंत्रीपदी बसणाऱ्या लेकाला आईकडून शाबासकी मिळाली.
देवेंद्र शांत, दयाळू, होतकरू आणि शूर आहे. कपटी तर तो नाहीच. त्याच्यावर जेंव्हा अशा टीका काही नेतेमंडळी करत असतात तेंव्हा मी व्यथित होते कारण माझा देवेंद्र कसाय हे मला चांगलंच ठाऊक आहे. असं त्या म्हणाल्या. खोटे बोलणे, कृत्रिम वागणे त्याच्या स्वभावात कधीही नव्हते असंही त्या म्हणाल्या..
राजकारणात कितीही बाका प्रसंग आला तरी..
राजकारणात कितीही बाका प्रसंग आला तरी संयमानं सामोरा जातो. असं सांगत बाहेर कितीही वाईट परिस्थिती असली तरी त्याचा परिणाम घरात तो कधीही होऊ देत नाही. घर आणि राजकारण देवेंद्रने पहिल्यापासून वेगहे ठेवलं आहे. असं सरिता फडणवीस म्हणाल्या. नातेवाईकांवर आलेल्या प्रसंगातही तो जातोच. पण कधी त्या शहरात गेल्यावर नातेवाईकांच्या घरी नक्की जातो. कुटुंबात चुलत सख्खे असं काही पहात नाही. सगळ्यांशी जिव्हाळ्यानं आणि आपूलकीनं वागतो अशी भावना सरिता फडणवीस यांनी व्यक्त केली.
आज आझाद मैदानावर शपथविधी
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Oath Ceremony) आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईच्या आझाद मैदानावर आज संध्याकाळी 5.30 वाजता शपथविधी सोहळा होईल. देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून कालपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण असणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर काल देवेंद्र फडणवीसांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली.