Eknath Shinde Oath: एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस नेमकं काय म्हणाले?
mahayuti oath taking ceremony: मुंबईतील आझा मैदानावर आज महायुती सरकारचा शपथविधी पार पडणार आहे. या सोहळ्यात एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का, हे पाहावे लागेल.
मुंबई: महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला अवघे काही तास उरले असताना एकनाथ शिंदे हे गुरुवारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही, याबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. बुधवारी दिवसभरात दोनवेळा देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. मात्र, एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदाबाबत ठाम असल्यामुळे खातेवाटपाबाबत तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे गुरुवारी मुंबईतील आझाद मैदानावर होऊ घातलेल्या शपथविधी सोहळ्यात (Mahayuti Oath Taking Ceremony) मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि काही मंत्री शपथ घेणार किंवा फक्त देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपद आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
एकनाथ शिंदे यांनी शपथविधीचा मुहूर्त जवळ येऊन ठेपला तरी गृहमंत्रिपदाची आपली मागणी लावून धरली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत काही मंत्र्यांचाही आज शपथविधी व्हावा, ही एकनाथ शिंदे यांची मागणी आहे. शिवसेनेला अपेक्षित खाती आणि संभाव्य मंत्र्यांबाबतही त्यांनी काल देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. मात्र, या चर्चेतून कोणताही तोडगा न निघाल्याने आता भाजपमधील वरिष्ठांशी चर्चा करुन कळवतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना सांगितल्याचे समजते.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
1. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधी सोबतच काही मोजक्या मंत्र्यांचा शपथविधी उद्या घ्यावा अशी मागणी एकनाथ शिंदेंनी केली.
2. शिवसेनेला मंत्रिमंडळात कुठली खाती अपेक्षित आहे आणि शिवसेनेचे कोण संभाव्य मंत्री असू शकतात याबाबत ही चर्चा झाली.
3. या सगळ्या संदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून कळवणार असल्याच देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंना सांगितले.
एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्याची चर्चा
महायुतीचा भव्य शपथविधी आज मुंबईच्या आझाद मैदान येथे संपन्न होतं आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारही शपथ घेणार हे निश्चित असताना. उपमुख्यमंत्री म्हणून शिवसेनेकडून कोण शपथ घेणार हा सस्पेन्स अजून कायम आहे. भायखळ्यात मात्र उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे बॅनर्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. तर दुसरीकडे सर्वच आमदारांकडून कालपासून शिंदे यांनी प्रशासनात राहून उपमुख्यमंत्री पदी बसावं अशी मागणी केली जात आहे. एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये सामील होण्याविषयी सकारात्मक असले तरी गृहमंत्रीपदाबाबत भाजपश्रेष्ठी काय भूमिका घेतात, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असल्याचे सांगितले जात आहे.
आणखी वाचा