फायर आजींच्या घरी 'मातोश्री', उद्धव ठाकरे यांनी सहकुटूंब घेतली चंद्रभागा शिंदे यांची भेट
Cm Uddhav Thackeray: खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचाविरोधात मातोश्री बाहेर पहारा देणाऱ्या आजींच्या घरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब भेट दिली आहे.
Cm Uddhav Thackeray: खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचाविरोधात मातोश्री बाहेर पहारा देणाऱ्या आजींच्या घरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब भेट दिली आहे. 92 वर्षीय चंद्रभागा शिंदे यांच्या शिवडी येथील घरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना आंब्याची पेटी भेट म्हणून दिली. तर रश्मी ठाकरे यांनी त्यांची गळाभेट घेतली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजींची भेट घेतल्यानंतर आपण त्यांना लहानपणापासून पाहत असून त्या आता आजी झाल्या आहेत, मात्र त्या अजूनही युवासेनेच्या असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तर यावेळी चंद्रभागा शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या नातूसाठी नोकरी आणि घराची मागणी केली आहे. येत्या रविवारी आजींच्या नातूच लग्न आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लग्नाची पत्रिकाही दिली आहे.
बाळासाहेबांनी तयार केलेले हे शिवैनिक झुकणारे नाही
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, ''शिवसेना प्रमुख नेहमी म्हणायचे जी व्यक्ती वयाने मोठी होत असते ती मानाने तरुण असली पाहिजे. या आजी देखील वयाने ज्येष्ठ असल्या तरी मनाने त्या अजूनही युवा सैनिक आहेत. हे असे शिवसैनिक मला मिळाले, हा बाळासाहेबांचा मला आशीर्वाद आहे.'' ते म्हणाले, ''काल कडाक्याच्या उन्हात या आजी बसल्या होत्या. आता त्यांनी करून दाखवलं झुकेगा नहीं, हे बाळासाहेबांनी जे शिवसैनिक तयार केले आहेत, ते झुकणारे शिवसैनिक नाही.''
नेमक्या कोण आहेत या आजी?
आजींचं नाव चंद्रभागा गणपत शिंदे. मुंबईतील शिवडी येथील त्या रहिवासी. अजुनही शिवडी नाक्यावर भाजीचा व्यवसाय करतात. तर पोलिसदूत म्हणून विभागात काम करतात आणि पोलिसांनाही सामाजिक कामात मदत करतात. आजींना दोन मुलं आणि दोन नातवंड आहेत. तर आजींचे पती बीपीटीमध्ये कामाला होते. सध्या ते हयात नाहीत. त्यामुळे आजींना त्यांची पेन्शन मिळते. आजींना विचारलं की, तुम्ही केव्हापासून शिवसैनिक आहात, तर त्या बाळासाहेबांपासून शिवसैनिक असल्याचं सांगतात. तसं आजींचं शिवसेनेसोबतंच नातंही खास आणि तितकंच सलोख्याचं. बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकांपैकी एक चंद्रभागा आजी.